पहुरच्या सराफी व्यापार्‍याचा निर्घूण खून

चौकशीकामी तीन संशयीत ताब्यात : खुनाचे ठोस कारण अद्याप अस्पष्ट

Brutal murder of Sarafi merchant of Pahur पहूर : पहूर कसबे येथील सराफा व्यावसायीकाचा निर्घृण खून झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर जामनेर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पूनमचंद गुलाबचंद वर्मा (42, पहूर कसबे, ता.जामनेर) असे खून झालेल्या सराफा व्यावसायीकाचे नाव आहे. पहूर पोलिसात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयीत चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहेत.

खुनाने उडाली खळबळ
पहूरमधील सराफा व्यावसायीक पूनमचंद वर्मा यांचे लोहारा, ता.पाचोरा येथे मेघराज ज्वेलर्स या नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे. वर्मा हे दररोज पहूर-लोहारा जा-ये करतात व शनिवार, 13 रोजीदेखील ते दुकान बंद करून घराकडे निघाले मात्र रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचलेच नाही. शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गोगडीच्या पुलाजवळ मात्र त्यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत असल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकर्‍यांनी 10 ते 12 वेळा त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची बाब उघड झाली आहे.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक भरत काकडे, पहूरचे निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. रात्री उशिरा मयताचे चुलत भाऊ प्रकाश शांतीलाल वर्मा यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्वच बाजूंनी पोलिसांचा तपास
मयत वर्मा यांच्या हातात अंगठी तसेच खिशात रोकड आढळल्याने ही हत्या लुटीसाठी नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर वर्मा यांच्याकडील बॅग व मोबाईलही गहाळ झाल्याने त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. चौकशीकामी तीन संशयीतांना ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली. मयत पूनमचंद गुलाबचंद वर्मा यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा मोठा परीवार आहे.