परिपूर्ण 25 रिक्षांना ‘स्टिकर’

0

जळगाव । पो लिस मुख्यालय परिसरातील मंगलम हॉल येथे झालेल्या रिक्षाचालकांच्या मेळाव्यात केलेल्या सुचनेनुसार आज मंगळवारी कागदपत्र पुर्ण असलेल्या 25 नियमात चालणार्‍या रिक्षाचालकांच्या रिक्षांवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याहस्ते विशेष स्टिकर लावण्यात आले. यानंतर शहर वाहतूक विभागातर्फे या रिक्षा चालकांची नोंद घेण्यात आली. याप्रसंगी विर सावरकर रिक्षा युनियनचे पदाधिकारी व सदस्य तसेच रिक्षा चालक याचबरोबर जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक गाढे पाटील व पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील यासह शहर वाहतुक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. यानंतर इतर रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली.

कागदपत्रांची करून घेतली तपासणी
मेळाव्यात सुचना दिल्या असल्यामुळे आज मंगळवारी सकाळपासूनच 50 रिक्षाचालकांनी स्वत: शहर वाहतुक कार्यालयात येवून आपल्या रिक्षांच्या कागपत्रांची तपासणी करून घेतली. यानंतर त्यांच्या रिक्षांवर वाहतुक शाखेतर्फे स्टिकर लावण्यात येणार आहे. या विशेष स्टिकरमुळे कागपत्रपूर्ण नसलेल्या रिक्षा वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांनी कागपत्र पुर्ण ठेवून त्यांची शहर वाहतुक शाखेत येवून तपासणी करावी आणि स्टिकर लावून घ्यावे असे आवाहन शहर वाहतुक शाखेतर्फे करण्यात
आले आहे.

वाहन चालकांवर कारवाई
जिल्ह्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट व सिटबेल्ट सक्की करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार 17 फेबू्रवारीपासून हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती करण्यात आली होती. यानंतर वाहतुक पोलिसांतर्फे हेल्मेट व सिटबेल्टचा वापर न करणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 17 फेब्रूवारी ते 6 मार्च पर्यंत वाहतुक शाखेतर्फे हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणार्‍या अशा 1 हजार 40 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 98 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच इतर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1 हजार 675 वाहन चालकांवर कारवाई करून 3 लाख 32 हजार 500 रुपयांचा दंड वसून करण्यात आला आहे. यानंतर देखील वाहतुक शाखेतर्फे नियमांचे उल्लघंन करणार्‍या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

मोटारसायकल लंपास
जळगाव । शहरातील बिग बाजारमधील पार्किंगमधून 29 जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर येथील रहिवासी भरत गोपीचंद वाधवाणी वय-36 हे 29 जानेवारी रोजी सायंकाळी बिग बाजार येथे मोटारसायकल क्रं.एमएच.19.बीएन. 3445 ने खरेदीसाठी आले होते. यानंतर पार्किंग परिसरात मोटारसायकल उभी करून ते मॉलमध्ये खरेदीसाठी निघून गेले. रात्री 10 वाजेच्या सुमारास खरेदी करून आल्यानंतर ते मोटारसायकल उभी केलेल्या ठिकाणी आले असता मोटारसायकल दिसून आली नाही. परिसरात शोध घेतला असता देखील मिळून न आल्याने चोरी झाल्याची त्यांना खात्री झाली.