परिचय मेळाव्यांतून अनेकांशी संवाद साधण्याची संधी मिळते : ढाके

0

आकुर्डीत लेवा पाटीदार मित्र मंडळाचा परिचय मेळावा उत्साहात

सांगवी : धकाधकीच्या जीवनात परिचय मेळाव्याची गरज असून भावी वधु-वरांसाठी असे उपक्रम आदर्श ठरत आहे. लेवा पाटीदार समाजातर्फे नेहमीच अभिनव उपक्रम राबवले जातात, ही कौतुकास्पद बाब आहे. लग्न सोहळ्यांवरील अनावश्यक खर्च टाळून गरजू व उपेक्षितांना सहकार्य करून समाज बांधवांनी एकत्रित रित्या सामाजिक उपक्रमांवर भर द्यावा, असे मत नगरसेवक नामदेव ढाके यांनी व्यक्त केले. लेवा पाटीदार मित्र मंडळ सांगवी, पिंपरी चिंचवड यांच्यावतीने आकुर्डी येथे खंडोबा सांस्कृतिक भवनात वधुवर परिचय मेळावा संपन्न झाला. यावेळी ढाके बोलत होते. प्रसंगी, प्रमुख पाहुणे भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, डॉ. सोहम नारखेडे, अ‍ॅड. प्रज्ञा पाटील, बी.टी.चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते वधु-वर सुचीचे प्रकाशन करण्यात आले. समाज राज्यभर विखुरलेला असून समाजबांधवांचा एकत्र येवून विचारांची देवाण घेवाण व्हावी. त्याच बरोबर सुलभ संपर्क होऊन आर्थिक आणि वेळेचा अपव्यय टाळला जावा, असे म्हणत ढाके यांनी आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

समाजात आणखी जनजागृती व्हावी

ढाके पुढे म्हणाले, नात्याचे रेशीम बंध आपल्या जीवनात सुखाचे रंग भरतात. जगातील सर्व वादांवर प्रेम आणि समोपचार हाच एकमेव तोडगा आहे. जी गृहिणी सुख-दुःखांना सामोरे जाऊन संसाराचा डोलारा समर्थपणे सांभाळते. त्या घरात लक्ष्मी नांदते. नव्या पिढीकडे खुप ज्ञान आहे, मात्र वेळेचा अभाव आहे. आणि अशा प्रकारच्या मेळाव्यातून एकाच वेळी अनेकांशी संवाद साधण्याची संधी प्राप्त होते. या बाबत समाजात आणखी जनजागृती व्हावी, अशी अपेक्षाही ढाके यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत झोपे यांनी केले. सुत्रसंचालन पंकज पाटील, प्रा. कमल पाटील तर आभार महेश बोरोले यांनी मानले. डॉ. लिलाधर पाटील, देवेंद्र पाटील, अशोक तळेले, प्रेमचंद पाटील, विलास पाटील, विष्णू चौधरी, भूषण गाजरे, नथ्थु भोळे यांनी संयोजन केले.