परराज्यातील कामगार पुणे शहराच्या वाटेवर

0

पुणे:– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या कालावधीत परराज्यातील कामगार हळूहळू पुन्हा एकदा शहराकडे परतू लागले आहेत. टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच पटना (दानापूर) येथून पुण्यासाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेतुन सुमारे १२०० प्रवासी पुण्यात दाखल झाले. दुसऱ्या दिवशीही तितकेच प्रवासी घेऊन गाडी दाखल झाली. त्याचप्रमाणे गोवा एक्स्प्रेसच्या माध्यमातून भोपाळमधूनही प्रवासी पुण्यात येऊ लागले आहेत.

टाळेबंदीमध्ये रोजगार बंद झाल्यानंतर विविध मार्गाने कामगार आणि मजुरांनी आपापल्या राज्यामध्ये धाव घेतली. या मंडळींची मागणी लक्षात घेता केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या नियोजनात १ मेपासून श्रमिक रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात आल्या. आजपर्यंत पुण्यासह राज्यातील विविध रेल्वे स्थानकावरून शेकडो श्रमिक रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदींसह देशाच्या विविध भागांत सोडण्यात आल्या. त्यातून लाखो प्रवासी आपापल्या राज्यात रवाना झाले आहेत.

श्रमिक गाडय़ा वगळता रेल्वेकडून १ जूनपासून देशभरातून विशेष रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. श्रमिक रेल्वे केवळ एकाच दिशेने सोडण्यात आल्या.

टाळेबंदीमध्ये सध्या विविध बाबतीत सूट देण्यात येत आहे. उद्योग, रोजगार आणि दुकानेही काही अटींवर सुरू झाले आहेत. अशा स्थितीत पर राज्यात गेलेले काही कामगार शहरात परतू लागले आहेत.

Copy