परतीच्या लढतीत विजयच ठेवेल हरिकाचे आव्हान कायम

0

तेहरान: महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आगेकूच करणाऱ्या भारताच्या ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाला उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. चीनच्या टॅन झोंगयीने ४४ चालींमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हरिकावर मात करून १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे परतीच्या लढतीत हरिकाला विजय मिळवावाच लागेल. जर तसे करण्यात ती यशस्वी झाली तर पुन्हा कोंडी फोडणाऱ्या दोन लढतींमधून हरिकाला पुनरागमन करण्याची संधी मिळेल; पण परतीच्या लढतीत बरोबरी किंवा पराभव झाल्यास हरिकाचे आव्हानही संपुष्टात येईल.

योग्य डावपेच आखून सामन्यावर पकड
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या हरिकाला चीनच्या खेळाडूने कोणतीच संधी दिली नाही. जवळपास ही लढत एकहाती झाली होती. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या झोंगयीची सुरुवात आश्वासक वाटली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात हरिकाने तिला तुल्यबळ लढत दिली. मात्र चिनी खेळाडूने योग्य डावपेच आखून मध्यंतरापर्यंत सामन्यावर पकड घेतली. त्यामुळे हरिकाला बचावात्मक खेळ करावा लागला. त्यानंतर झोंगयीने योग्य चाली आखून ४६व्या चालीत विजय निश्चित केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत अनेक नाटय़मय वळणानंतर रशियाच्या अ‍ॅलेक्झांड्रा कोस्टेनियूकला सुरुवातीच्या आघाडीनंतरही युक्रेनच्या अ‍ॅना मुझीचुकविरुद्ध पराभव पत्करावा लागला. ६४ चालींच्या या लढतीत काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या अ‍ॅनाने चतुराईने खेळ करत बाजी मारली. त्यामुळे परतीच्या लढतीत तिला आगेकूच करण्यासाठी बरोबरीही पुरेशी आहे.