परतीच्या जोरदार पावसामुळे भात पिकास जीवदान; शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण

0

तळेगाव : मान्सूनच्या परतीच्या जोरदार पावसामुळे मावळ तालुक्यातील खरीप भात पिकास जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर या पावसाने रब्बी पिकांच्या पेरणी पूर्वीच्या कामांना वेग आला आहे. गेली तीन-चार दिवस मावळ तालुक्याच्या विविध भागात वळवाचा पाऊस जोरदारपणे पडत आहे. या पावसामुळे अखेरच्या टप्यात काढणीस आलेल्या भात पिकाला चांगलेच जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे.

यावर्षी भात पेरणीच्या वेळेस पावसाने चांगलाच हात दिला होता. त्यानंतर वेळोवेळी भात पिकाच्या वाढीप्रमाणे समाधानकारक पाऊस पडल्याने यावर्षी खरीप भात पिक अतिशय चांगले आलेले आहे. अखेरच्या टप्यात पावसाची आवश्यकता असताना पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे यावेळेस भात पिक जोमात येईल असा अंदाज शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे. यावर्षी मावळ तालुक्यात सुमारे 30 हजार एकर क्षेत्रावर भात पिक घेतलेले आहे. तसेच पूर्व पट्ट्यात खरीप भुईमुग पिकाच्या काढणीला हा पाऊस उपयुक्त आहे. या पावसामुळे आगामी काळातील रब्बी पिकाच्या पेरणी पूर्व कामाला आणि पेरणीला या पावसाचा चांगला फायदा होणार आहे. रब्बी ज्वारी, हरबरा, करडई आदी पिकांच्या मशागती आणि पेरण्या वेगाने सुरु होतील, अशी आशा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

Copy