पबजीचा ‘गेम’

0

डॉ.युवराज परदेशी:

भारत-चीन सीमेवरील गलवान खोर्‍यातील तणावानंतर भारताने चीनची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. चीनी कंपन्यांसोबतचे अनेक करार रद्द केल्यानंतर अनेक अ‍ॅप्सवर बंदी आणली आहे. भारताने आत्तापर्यंत तीन टप्प्यात 224 चिनी अँप्स वर बंदी घातली. पहिल्या टप्प्यात टिकटॉक, हॅलो, शेयर इट सारख्या 59 अ‍ॅप्स वर बंदी घातली होती, तेव्हा सरकारने सुरक्षेचे कारण सांगितले होते. त्यानंतर केंद्र सरकारने दुसर्‍या टप्प्यात 49 अँप्स वर बंदी घातली, आणि आता 118 अँप्स वर बंदी घातली आहे. यात सध्या सर्वाधिक लोकप्रिय मल्टीप्लेयर इंटरनेट गेम असलेल्या पबजीचा देखील समावेश आहे. सरकारने पुन्हा भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका असल्याने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगितले आहे. पबजी या गेमचे व्यसन अन्य नशेच्या पदार्थांमुळे जडणार्‍या व्यसनाइतकेच घातक आणि प्रसंगी जीवघेणे असल्याचे आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांमुळे दिसून येते. यामुळे चीनमुळे का होईना, या पबजीचा ‘गेम’ झाल्याने तरुणाई व्यसनाधिन होण्यापासून वाचली आहे.

भारतात पबजी या मोबाईलवरील गेमची मोठी चर्चा आहे. पबजी हा गेम 2017 मध्ये रिलीज झाला आणि दोन वर्षांच्या आत तो सर्वात लोकप्रिय खेळ बनला. जगभरात 40 कोटी मुले आणि तरुण हा खेळ रोज खेळतात. भारतात पबजी खेळणार्‍यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. व्हिडिओ गेमच व्यसन हे वास्तविक मानसिक विकाराचे लक्षण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. हा एक ऑनलाईन गेम असून हा खेळ खेळणार्‍या व्यक्तीला स्वतःला जीवंत ठेवत दुसर्‍याला मारावे लागते. जो खेळाडू अशा तर्‍हेने जीवंत राहतो तो विजेता ठरतो. हा खेळ खेळणारी व्यक्ती एका आभासी जगात वावरते. या खेळामुळे खासकरून तरुण व लहान मुले हिंसक बनल्याचे निरीक्षण आतापर्यंत अनेकवेळा नोंदविले गेले आहे. यामुळे या गेमवर बंदी घालण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने होत आली आहे. शेजारच्या नेपाळ व पाकिस्तानमध्येही या गेमवर आधीच बंदी घालण्यात आली आहे. तरुणांवर आणि मुलांवर या गेमचा वाईट प्रभाव पडत असल्याने न्यायालयाच्या मध्यस्थिनंतर नेपाळमध्ये यावर बंदी घालण्यात आली तर अश्‍लिलता पसरवण्याच्या आरोपावरुन पबजीसाठी पाकिस्तानची दारे बंद झाली.

भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष युध्द सुरु होण्याची शक्यता खूप कमी असली तरी भारताने चीनसोबत डिजिटल युध्द सुरु केले आहे. भारतात प्रचंड लोकप्रिय असणार्‍या चीन बनावटीच्या अ‍ॅप्स व गेम्सवर डिजिटल स्ट्राईक करत भारताने चीनविरुध्द या क्षेत्रातील युध्दाचे बिगूल फुंकले आहे. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणार्‍या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये 108 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता तिसर्‍या टप्प्यात चीनची गुंतवणूक असणार्‍या अन्य देशांच्या अ‍ॅप्स व गेम्सवर भारताने निशाणा साधला आहे. पबजी हा जगप्रसिद्ध गेम दक्षिण कोरियाची व्हिडिओ गेम कंपनी ब्लूहोलच्या सब्सिडियरी कंपनीने बनवला आहे. या गेमचे कनेक्शन चीनच्या कंपनीसोबत आहे. टेंसेंट कंपनीने पबजीला चीनमध्ये लाँच करण्याची ऑफर दिली होती. मात्र काही वर्षांनंतर पबजीला चीनमध्ये बंदी घातली आहे. त्यामुळे पबजीची ऑनरशीप संयुक्त आहे. यामुळे सुरक्षिततेचे कारण देत भारताने पबजीवर बंदी घातली आहे. टिकटॉक, पबजी यासारख्या अ‍ॅप्सचा देशविरोधी कारवायांसाठी प्रमुख अस्त्र म्हणून वापर होत असल्याची चर्चा अधून मधून रंगत असते. अमेरिकेत मेड इन चायना असलेले अ‍ॅप यूजर्सचा डाटा तर गोळा करत नाहीत ना? याबाबतची हा तपास सुरू आहे. भारतात वापरण्यात येणार्‍या जवळपास सर्व सोशल मीडिया संकेतस्थळांची मालकी परदेशी आहे.

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने ज्याच्याकडे जास्त माहिती असेल तोच सर्वशक्तीशाली असेल, असे म्हटले जाते. भविष्यात कोणत्या देशांमध्ये युध्द जरी झाले तरी त्या माहिती हेच मोठे शस्त्र ठरेल. आपण विविध प्रकारचे अ‍ॅप्स वापरत आहोत. अनेक अ‍ॅप्स आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्या आवडी-निवडींपासून इत्यंभूत माहिती परदेशी कंपन्यांकडे पाठवित आहोत, याकडे आपले सोईस्कररित्या दुर्लक्ष होते. पबजी गेम तर दोन्ही बाजूंनी घातक आहेे. या अ‍ॅपच्यामाध्यमातून माहितीची चोरी तर होतेच मात्र यामुळे तरुण पिढीची वाटचाल बरबादीच्या दिशेने सुरु झाल्याचे दिसते. पबजीमुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढते, मुलांची एकाग्रता कमी होते, गेममुळे मुलांचे खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रकृतीवर परिणाम होतो, पबजी गेममुळे मुले घरच्यांपासूनच दुरावली जातात, अशी ओरड अनेक पालकांची असते. कारण तशा काही घटनाही आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी बेळगावमधील एका 21 वर्षीय युवकाने पबजी खेळू न दिल्यामुळे आपल्या वडिलांचा शिरच्छेद केल्याची घटना घडली होती. त्याआधी महाराष्ट्रात रेल्वे रुळावर उभे राहून पबजी खेळण्यात मग्न असलेल्या दोन तरुणांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने या गेमच्या नादाने आपले राहते घर सोडले. जालंधरमध्ये एका किशोरवयीन मुलाने आपल्या वडिलांच्या खात्यातून 50 हजार चोरले होते. अन्य एका मुलाने सतत 45 दिवस हा खेळ खेळल्याने मज्जातंतूंना गंभीर नुकसान होऊन एका 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.

पबजी गेम मधील पार्टनरमुळे एका नवविवाहित महिलेने पतीला घटस्पोट दिला, जास्तवेळ पबजी खेळल्यामुळे नागपूरमधील एका तरुणाची मानसिक स्थिती बिघडली होती, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. पबजीमुळे तरुणांमध्ये डिप्रेशन, चिंता, अनिद्रा, चिड़चिडेपण यात वाढ होतेच याचबोबर अन्य गोष्टींवरदेखील लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात. या गेमच्या आहारी गेलेले अनेक जण समाज आणि आपल्या परिवारातील लोकांशी बोलणेदेखील बंद करतात. जेव्हा त्यांना पबजीपासून लांब राहावे लागते तेव्हा त्यांची प्रचंड चिडचिड होते. आता या पबजीवर बंदी घालण्यात आल्याने यामुळे चीनचे किती नुकसान होते याचे मुल्यमापन नंतर होईलच परंतू यामुळे भारतातील तरुणांना एका मोठ्या व्यसनापासून लांब ठेवणे शक्य होणार आहे.

Copy