पद्म पुरस्कारापासून बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अजूनही वंचित

0

नवी दिल्ली । मी देशासाठी तब्बल 15 वर्षे खेळत आहे. याशिवाय, मी अनेक मानाच्या स्पर्धाही जिंकल्या आहेत. ज्वाला गट्टा हिने या पुरस्कारासाठी तिसर्‍यांदा अर्ज करूनही तिला हा पुरस्कार मिळाला नाही. यानंतर तिने पद्म पुरस्कारांच्या एकूण प्रक्रियेबद्दलच काही सवाल उपस्थित केले.भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हिने तिला पद्म पुरस्कार न मिळाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्वालाने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून याबद्दल भाष्य करताना पद्म पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नाराजी व्यक्त : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी विराट कोहली, ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. देशातील मानाच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या पुरस्कारासाठी अर्ज करावा लागतो, हेच मला काहीसे आश्चर्यकारक वाटते. मात्र, प्रक्रियेचा एक भाग म्हणून मी पुरस्कारासाठी अर्ज केला होता. माझ्या खेळामुळे देशातील लोकांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार असल्याने तो मिळावा, असे मला वाटत होते, अशा शब्दांत ज्वालाने आपल्या भावना व्यक्त केल्या. बॅडमिंटनमध्ये दुहेरीतील तज्ज्ञ म्हणून ओळखली जाणार्‍या ज्वाला गट्टा हिने 2010च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला दुहेरीत भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले होते.

शिफारस पुरस्कारासाठी आवश्यक का?
याशिवाय, 2011 साली लंडन येथील जागतिक स्पर्धेत दुहेरीत ज्वालाने कांस्यपदक मिळवले होते. मी देशासाठी तब्बल 15 वर्षे खेळत आहे. पद्म पुरस्कारासाठी अर्ज करणे मला योग्य वाटले. मात्र, पुरस्कार मिळविण्यासाठी या एवढ्याच गोष्टी पुरेशा नाहीत, असे मला वाटते. तुम्हाला पुरस्कार मिळवायचा असेल तर शिफारशींची गरज लागते. मुळात पुरस्कार मिळविण्यासाठी अशाप्रकारे अर्ज आणि शिफारश करण्याची गरजच काय आहे? माझे यश पुरेसे नाही का? त्यामुळे मला या संपूर्ण प्रक्रियेबद्दलच एकप्रकारची उत्सुकता आहे. मी कॉमनवेल्थ आणि जागतिक स्पर्धेत मिळवलेली पदके पुरेशी नाहीत का?