पत्रकार कक्षाचे स्थायी समिती कार्यालयात विलीनीकरण

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका प्रशासकीय इमारतीच्या तिसर्‍या माळ्यावर पत्रकारांसाठी असलेल्या दालनाचे रविवार सुटीच्या दिवशी स्थायी समिती कार्यालयात विलीनीकरण करण्यात आले. या घटनेचा पत्रकारबांधवासह सर्वस्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. गेल्या 21 वर्षापासून हा कक्ष पत्रकार बांधवांसाठी देण्यात आलेला होता. या कक्षात दैनिक, सांय दैनिक, साप्ताहिक, मासिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी एकाच ठिकाणी स्वतंत्र कप्पे देण्यात आलेले होते. राजकीय, सामाजिक, माहिती कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिक आपले निवेदन व लोकोपयोगी कार्यक्रमांची माहिती असलेले पत्रक त्यात ठेवत असत. मात्र, या प्रकारामुळे पत्रकारांसह शहरवासीयांची सुद्धा गैरसोय झालेली आहे.

सकारात्मक तोडगा काढणार
या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी व कक्ष पुन्हा मिळावा यासाठी पुढील धोरण ठरविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ, पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघातर्फे संयुक्त बैठक पार पडली. चर्चेअंती शिष्टमंडळाने महापौर नितीन काळजे यांची भेट घेत कक्ष होता तेथेच राहू द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावर काळजे यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करतो असे आश्‍वासन दिले. तर स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी स्थायी समिती कार्यालयाला जागा अपूर्ण होती ती विस्तारित करून मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. पत्रकार कक्ष हटवावा हा हेतू नव्हता. मात्र, याच मजल्यावर पत्रकारांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्‍वासन त्यांनी दिले. पत्रकारांच्या शिष्टमंडळात बापूसाहेब गोरे, सायली कुलकर्णी, सुनील लांडगे, बिपेश सुराणा, अनिल कातळे, सुनील कांबळे आदींचा समावेश होता.

कारवाई करा : भापकर
1986 पासून असलेला पत्रकार कक्ष फोडण्यात आलेला आहे. तो फोडणार्‍यांवर योग्य ती कारवाई करत कक्ष होता तेथेच ठेवण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. हा कक्ष हटविल्यामुळे राजकीय, सामाजिक, माहिती कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिकांची गैरसोय झालेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पाशवी बहुमत मिळाले आहे. त्या बहुमताच्या जोरावर प्रशासनावर दबाव आणत हा कक्ष सुटीच्या दिवशी तोडण्यात आला. हा भाजपचा सत्तेचा माज आणि मस्ती असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत या कक्षात पत्रकारांच्या उपस्थितीमुळे पदाधिकार्‍यांवर दबाव होता. मात्र, सर्व गैरप्रकार बिनबोभाट करता यावेत म्हणून ही शक्कल लढविण्यात आल्याचा आरोपही भापकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे.