Private Advt

‘पत्रकारितेतील नवे आयाम’ या विषयावर सहा विद्यापीठांतर्फे ऑनलाईन व्याख्यान

मराठी पत्रकारितेला क्रांतिकारी वारसा : प्रा. डॉ. संजीव भानावत

जळगाव – देशाच्या बहुभाषिक पत्रकारितेत मराठी पत्रकारितेला क्रांतिकारी वारसा आहे. बाबूराव पराडकर, बाळशास्त्री जांभेकर यांच्यासाख्या मराठी पत्रकारांनी पत्रकारितेत इतिहास निर्माण केला. पत्रकारिता हे व्रत असून त्याद्वारे समाजबदलाची प्रक्रिया घडून येते. ही प्रक्रिया ताकदीने घडण्यासाठी नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या पत्रकारांनी बहुविध माध्यम कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन राजस्थान जयपूर विद्यापीठाच्या जनसंचार केंद्राचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. संजीव भानावत यांनी केले.

मराठी पत्रकार दिनानिमित्त “पत्रकारितेतील नवे आयाम” या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या विद्यापीठातील पत्रकारिता विभागांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमासाठी डॉ. भानावत यांच्यासह व्याख्याते म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, साम टी.व्ही.चे सहसंपादक राजेंद्र हुंजे हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्र-कुलगुरू डॉ. बी.व्ही. पवार होते.

यावेळी सहभागी विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर (जळगाव), डॉ. रवींद्र चिंचोलकर (सोलापूर), डॉ. निशा पवार (कोल्हापूर), डॉ. उज्वला बर्वे (पुणे), डॉ. मोईज हक (नागपूर), डॉ. दिनकर माने (औरंगाबाद) उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजीव भानावत पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेपुढे स्वातंत्र्याचे जाज्वल्य ध्येय होते. अलीकडील काळात पत्रकारितेला व्यावसायिक रूप आले आहे. प्रत्येक बदल हा जशी नवी आव्हाने उभे करतो तसेच त्यातून नव्या संधी, नवे आयाम तयार होत असतात. कोरोना काळाने हे स्पष्टपणे सिद्ध केले आहे. कोरोना काळात अनेक वृत्तपत्रे डिजिटल माध्यमांत रुपांतरीत झाली. बदल स्विकारणे निसर्गनियमाला धरून असते. वृत्तपत्रे व इतर सर्वच माध्यमे हा बदल वेगाने स्वीकारत आहेत. डिजिटल माध्यमांतून प्रकाशाच्या गतीने बातम्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. असे असले तरी फक्त माहिती पोहोचविण्यापुरती पत्रकारिता करून चालणार नाही. क्रांतिकारी पत्रकारितेचा वारसा जोपासायला हवा. आगामी काळात आरोग्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा विषय असेल. पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन आधारित डेटा जर्नालिझम अवगत करावे लागेल. ओटीटी, व्ही.ओ.डी. (व्हिडीओ ऑन डिमांड), आर्टिफिअल इंटेलिजन्सचे तंत्र अभ्यासावे लागेल.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्र-कुलगुरू डॉ. बी.व्ही. पवार म्हणाले की, पत्रकारितेचे विश्व विस्तारत आहे. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पुढे जाऊन डिजिटल माध्यमांद्वारे गतिमान पत्रकारिता केली जात आहे. माध्यमांचे स्वरूप बदलले असले तरी पत्रकारितेवरील विश्वास तसाच दृढ आहे. नव्याने पत्रकारितेत येणाऱ्या पत्रकारांनी नव्या जगाची पत्रकारिता करावी. लोकांची माहितीची गरज ओळखावी. जनमत निर्माण करणारी पत्रकारिता करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर म्हणाले की, जनसंपर्क हा विषय खूप व्यापक आहे. जनसंपर्कातून समाजासोबत संवादाचा सेतू बांधला जातो. जनसंपर्क म्हणजे दिखावा नव्हे. जनसंपर्क ही दुहेरी संज्ञापन प्रक्रिया आहे. शासकीय संस्था, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कंपन्या यांनी आपला संवाद अधिक दृढ करण्यासाठी जनसंपर्क केलाच पाहिजे. माध्यमक्रांती ही जनसंपर्कासाठी मोठी पर्वणी आहे. जनसंपर्काची साधने आधुनिक बदलली आहेत. जनसंपर्काची पोहोच किती आहे हे सध्याच्या आधुनिक माध्यमाच्या युगात पडताळता येते. माध्यमांसोबतच जनसंपर्क क्षेत्रातही करिअरच्या खूप संधी निर्माण होत आहेत. मी एकाच माध्यमात काम करीन हा दुराग्रह बाळगू नये. संसदीय लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांनी मनापासून प्रयत्न करावेत. यावेळी काशीकर यांनी जनसंपर्कातील नवे आयाम विशद करताना सांगितले की, आज सर्वच प्रसारमाध्यमे विविध उपक्रमातून जनसंपर्क करीत आहेत. ती काळाची गरज आहे.

साम टीव्हीचे सहसंपादक राजेंद्र हुंजे म्हणाले की, पत्रकारिता हे बदलणाऱ्या गोष्टींचेच केंद्र आहे. माध्यमात सतत बदल स्वीकारले जातात. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. दूरचित्रवाणी पत्रकारितेत आशय व सादरीकरणाला खूप महत्त्व आहे. कौशल्ययुक्त पत्रकारिता ही सध्याच्या काळाची गरज आहे. पत्रकारिता ही सतत नवे शोधण्यात पुढे गेली पाहिजे. परिस्थितीकडे साकल्याने जेव्हा बघू तेव्हाच आपण नवे काही करू शकू. पत्रकारिता ही कमी शब्दात अधिक आशय व्यक्त करणारी, चिंतन करायला लावणारी हवी असेही शेवटी त्यांनी सांगितले.

प्रारंभी प्रास्ताविक प्रा. डॉ. निशा पवार (कोल्हापूर) यांनी केले. डॉ.सोमनाथ वडनेरे (जळगाव) डॉ. भास्कर भोसले (औरंगाबाद) अर्पण पठाणे (नागपूर) निशिगंधा क्षीरसागर (पुणे) यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार डॉ. विनोद निताळे यांनी मानले. डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले