पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित

0

जळगाव। उ त्तर महाराष्ट्र विद्यापीठा अंतर्गत जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग 2006 पासून सुरु आहे. विद्यापीठात हा दोन वर्षीय अभ्यासक्रम नियमित सुरु आहे. अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत दिली जाणारी शिषवृत्ती 2014 पर्यत नियमित रुपाने मिळत होती. मात्र 2014 पासून अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गाचे विद्यार्थी वगळता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिषवृत्ती बंद करण्यात आली. विजा, ओबीसी, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिषवृत्ती पासून वंचीत आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासन मागील दोन-तीन वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी याकरीता मॅपींग करावे या मागणीसाठी समाज कल्याण विभाग जळगाव यांच्याकडे सातत्याने पाठपुरवठा करीत आहे. मात्र समाज कल्याण विभाग प्रस्तावाची दखल घेत नसल्याने विद्यार्थी शिषवृत्तीच्या लाभापासून वंचीत आहे. समाज कल्याण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

नाशिक विभागाकडून वारंवार चुका
उमवी प्रशासनाने समाज कल्याण विभागाकडून सुचविलेल्या सर्व दुरुस्ता पुर्ण केल्या. नाशिक उपपविभागीय कार्यालयाने अ, ब, क प्रपत्र जोडण्याची दुरुस्ती सुचविली. नाशिक उपविभागीय कार्यालय पुन्हा पुन्हा चुका काढत आहे. नाशिक विभागाकडील दुरुस्तीचे पत्र समाजकल्याण विभागात दोन महिन्यापासून पडुन होते. स्वतःविद्यार्थी शिषवृत्ती संदर्भात समाज कल्याण अधिकारी यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे दुरुस्तीचे पत्र देण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या गलथान कारभारामुळे दुरुस्तीचे पत्र विद्यापीठाकडे वेळेवर पोहोचविले जात नाही.

अभ्यासक्रमाला शिषवृत्ती लागु
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात खानदेशाती धुळे, नंदुरबार, जळगाव या तीन जिल्ह्यातील महाविद्यालयाचा समावेश होतो. खानदेशात तीन महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रम सुरु आहे. धुळे येथील विद्यावर्धीनी महाविद्यालय, जळगाव शहरातील मु.जे.महाविद्यालय आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या तीन ठिकाणी पत्रकारिता अभ्यासक्रम सुरु आहे. विद्यावर्धीनी व मु.जे.महाविद्यालयातील सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिषवृत्ती दिली जाते. मात्र उमवीतील विद्यार्थ्यांवर अन्याय का? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

शिष्यवृत्तीच्या भरोसे प्रवेश
पत्रकारिता अभ्यासक्रम हा व्यवसायिक अभ्यासक्रमात मोडतो. शासनाकडून या अभ्यासक्रमाला शिषवृत्तीची मान्यता आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षीय आहे. अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात. प्रवेश फी ही जास्त असल्याने शिषवृत्ती मिळेल या आशेने विद्यार्थी अभ्यासक्रमात प्रवेश घेतात. शिषवृत्ती मिळत नसल्याने तसेच दोन्ही वर्षासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रवेश शुल्क न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांचे कागदपत्र विद्यापीठात अडकुन पडले आहे.