पत्रकारावर हल्ला करणार्‍यांना पोलिस कोठडी

0

नवी मुंबई :- राहत्या सोसायटी मध्ये झालेल्या अंतर्गत वादातून पत्रकारावर हल्ला करणार्‍या पाच जणांना खारघर पोलिसांनी अटक केली.या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आकाश कृष्णा पाटील (24) विचुंबे -पनवेल, अशोक जगन्नाथ भोईर (30) पडघ – पनवेल, विश्वास आत्माराम कथारा (30), नेवाळे गाव – पनवेल, अनंता तुकाराम कथारा (26) नेवाळे गाव – पनवेल, मयूर कृष्णा ठाकूर (30) नवीन पनवेल अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे असून सर्व पनवेलमध्ये राहणारे आहेत.या सर्वाना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 5 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तो हल्ला सोसायटी मधील अंतर्गत वादातून झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोसायटी मधील विरोधी गटाची चौकशी सुरु केली.त्यावेळी सदर प्रकरण हे वादातूनच झाले असल्याचा संशय पोलिसांना आला.त्या दिशेने तपासाला गती देण्यात आली असता चौकशीअंती पाच जणांना अटक करण्यात आली. पत्रकार सुधीर सूर्यवंशी हे पनवेलमधील उच्चभ्रू सोसायटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कल्पतरू हौसिंग सोसायटीत राहतात.सध्या ते या सोसायटीचे चेअरमन असल्याचे समजत आहे. शुक्रवारी सूर्यवंशी खारघर येथे कामानिमित्त आले असता यांच्यावर दुपारी प्राणघातक हल्ला झाला.सदर हल्याचे वृत्त समजताच पत्रकार क्षेत्रात खळबळ माजली व सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येऊ लागला