पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची 85 हजारांची मंगलपोत लांबविली

0

जळगाव: साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतत असतांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी उज्ज्वला प्रकाश चौधरी वय 47 या विवाहितेची 85 हजार रुपयांची मंगलपोत लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास भिकमचंद जैन नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील पिंप्राळा रोडवर भिकमचंद जैन नगरात उज्ज्वला चौधरी या पती, मुलगा निरज अशांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती भुसावळ रेल्वेमध्ये इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे. 27 रोजी चौधरी राहत असलेल्या परिसरात त्याचे परिचीत सुपडू तमखाने यांच्या मुलीचा साखरपुडा होता. या कार्यक्रमास उज्ज्वला चौधरी ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रम आटोपून त्या दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घरी परतत होत्या. घराजवळ पोहचल्या, गेट उघडणार तोच दुचाकीवरुन जाणार्‍या दोघांनी दुचाकी थांबवून एक चिठ्ठी दाखवून पत्ता विचारला. चौधरी यांनी चिठ्ठी हातात न घेता, त्या संशय आल्याने मागे सरकल्या. तोच दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने चौधरी यांच्या गळ्यातील मंगलपोत तोडली. यानंतर दोघेही भरधाव वेगाने पसार झाले. चौधरी यांच्या आरडाओरडने घराजवळील दोन मुलांनी दोघांचा पाठलाग केला. मात्र ते त्याच्या हातील लागले. याप्रकरणी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे करीत आहेत.

Copy