पती, पत्नीची कुर्‍हाडीने वार करून हत्या

0

यावल – सातपुड्याच्या जंगलात डिंक वेचायला गेलेल्या तरुण दाम्पत्याची कुर्‍हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आाली आहे. कलजा लक्ष्मण पावरा (वय- 26) आणि रिटा कलजा पावरा (वय- 23) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून खूनाचे नेमके कारण काय? आणि हल्लेखोर कोण? याबाबत चर्चेला उधाण आले होते.

खडकाई नदीपात्रात मृतदेह

यावल अभयारण्यातील लंगडाआंबा या आदिवासी गावापासून जवळच असलेल्या रुईखेडा येथील रहिवासी कलजा पावरा आणि त्याची पत्नी रिटा कलजा पावरा हे रविवार 5 रोजी दुपारी गावाजवळील जंगलात डिंक जमा करण्यासाठी गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत दोघे घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध केली. यादरम्यान रात्री 10.30 वाजेच्या सुमारास सातपुड्यात उगम पावणार्‍या खडकाई नदीपात्रात दोघांचे मृतदेह आढळले. मयताचे वडील लक्ष्मण पावरा यांनी या संदर्भात यावल पोलीस स्थानकात संपर्क साधला असता पीएसआय अशोक अहिरे, हेकॉ पांडुरंग सपकाळे, पोकॉ सुमीत बाविस्कर, जाकीर शेठ आदींनी घटनास्थळी जाऊन पंचानामा केला. दोघांच्या मृतदेहावर कुर्‍हाडीने वार केल्याच्या जखमा असून बाजूलाच कुर्‍हाड देखील पडली होती असे यात आढळून आले. सोमवार 6 रोजी सायंकाळी दोघांचे मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. रात्री उशीरा या दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान याबाबत यावल पोलीस स्थानकात गु.र.नं. 21/17 भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील व डीवायएसपी अनिल थोरात यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.