पक्ष वाढीसाठी आता जिल्ह्यात बेरजेचे राजकारण

0

भुसावळ : राज्यात 1960 मध्ये ज्याप्रमाणे कै. यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण केले, त्याच धर्तीवर आपल्याला पक्ष वाढीसाठी जळगाव जिल्ह्यात बेरजेच्या राजकारण करायचे असून नाथाभाऊ पक्षात आल्याने आता पक्षाची ताकद वाढली असून खडसेंच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करणार्‍या नगरसेवकांना आम्ही संरक्षण देऊ, असे ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भुसावळात दिली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तेली समाज मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी आयोजित परीवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

अनेकांचा भाजपात प्रवेश
वरणगाव येथील माजी नगरसेवक तथा भाजपचे तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, माजी नगरसेविका रोहिणी जावळे, भाजपचे माजी शहराध्यक्ष महेश सोनवणे, बोदवड बाजार समितीचे संचालक किशोर भंगाळे, नगरसेवक विपीन भंगाळे, शे. इफ्तेकार खान, खडका ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील, मोहन भिरुड आदींसह वरणगाव येथील माजी नगरसेवक व भाजपच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.

भुसावळ गुन्हेगारीत नंबर वन : संतोष चौधरी
माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की, भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत किमान 41 सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आणणार असून पुढील विधानसभेत जिल्ह्यातील किमान पाच ते सहा आमदार पक्षाचे असतील, असेही त्यांनी सांगत भुसावळ विधानसभेच्या तिकीट वाटपाबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. गतवेळी एबी फार्म गायब झाला व अनपेक्षित घडले मात्र यापुढे असे घडायला नको, असे सांगत ते म्हणाले की, भुसावळात गुन्हेगारी वाढली असून अवैध सावकारीला ऊत आला आहे शिवाय चांगल्या पद्धत्तीने शोध मोहिम राबवल्यास किमान पोतेभर कट्टे आढळतील , असा दावा त्यांनी करीत चाळीसगावपेक्षा भुसावळात दोन नंबरचे धंदे अधिक बोकाळल्याचे सांगितले. शहरातील नागरीकांचे आरेाग्य अधिक समृध्द व्हावे यासाठी श्री. साईबाबा मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सिंगापूर पॅटर्न राबविणार असल्याचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी सांगितले. यात आरोग्यासाठी एक किलो वजन कमी केल्यास एक ग्रॅम सोने दिले जाईल. दहा किलो वजन कमी करणार्‍यास दहा ग्रॅम सोने मंदिर ट्रस्टतर्फे देऊ, असेही त्यांनी सांगितले.

सचिनला राजकारणात पुढे आणा, आम्ही पाठिशी : एकनाथ खडसे
एकत्र येऊन काम करण्यासाठी दोन पाऊले पुढे व मागे टाकावे लागतात. भुसावळचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत मात्र त्यांच्या काही अडचणी आहेत. याबाबत सोबत बसून चर्चा करु, या संदर्भात आजच जयंत पाटील यांच्याशी बोललो, असे चौधरींना उद्देशून खडसेंनी आपल्या भाषणात सांगितले. आगामी काळात तुम्ही सचिनला पुढे आणा आम्ही त्याच्या पाठिशी आहोत, असे सांगून खडसेंनी माजी आमदार संतोष चौधरी यांचे सुपूत्र सचिन चौधरींना राजकारणात अधिक सक्रिय करण्याचे संकेत दिले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, युवती सभेच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवा कार्याध्यक्ष रवी वरपे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, बाजार समिती सभापती सचिन चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा ओबीसी सेलचे उमेश नेमाडे, शहराध्यक्ष नितीन धांडे, सतीश घुले, धीरज चौधरी, जय चौधरी, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Copy