पक्के रस्ते तर सोडाच पण, मुरुमाचेही रस्ते नाहीत

0

प्रभाग 3 मधील नागरिकांचा मनपा प्रशासनाला संतप्त सवाल;मुलभूत सुविधांपासून वंचित

जळगाव– शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. प्रभागात असलेल्या ज्ञानदेवनगरात तर पक्के रस्ते नाहीत,गटारी नाहीत,पथदिवे नाहीत,साफसफाई होत नाही,ठिकठिकाणी असलेल्या खुल्या जांगावर मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. नागरिकांना लोकसहभागातून रस्त्यांची कामे केली आहेत.पक्के रस्ते तर सोडाच पण मुरुमाचेही रस्ते नाहीत. जळगाव हे शहर असूनही खेडे गाव आहे की,काय? अशी प्रचिती यायला लागली असल्याच्या तीव्र भावना व्यक्त करत येथील नागरिकांनी निद्रिस्त असलेल्या मनपा प्रशासनावर हल्लाबोल चढवला.दरम्यान,पथदिवे,रस्ते आणि गटारी करुन द्याव्यात अशी मागणी देखील नागरिकांनी केली.

प्रभाग क्रमांक 3 मध्ये वाल्मिकनगर,कोळीपेठ,दिनकरनगर,तानाजी मालुसरे नगर,खेडी,पिपल्स बँक कॉलनी,ज्ञानदेवनगर या परिसराचा समावेश आहे. या परिसरात दैनिक जनशक्तिच्या टीमने पाहणी करुन नागरिकांच्या मुलभूत समस्या जाणून घेतल्या.यावेळी परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या कार्यपध्तीवर चांगलेच ताशेरे ओढले.ज्ञानदेव नगरात कच्चे रस्ते असल्यामुळे आणि सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने चिखल असतो.परिणामी पायी चालणे कठिण होत आहे.वाहनधारकांना तर अक्षरश: कसरत करावी लागत आहे.या वार्डात 20 वर्षापासून रहिवास असूनही या मुलभूत सुविधा मिळत नसतील तर मनपा प्रशासनाला कर का द्यायचे? असा संतप्त सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला.

साथरोगाचा फैलाव

शहरात साफसफाईसाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन एकमुस्त ठेका दिला आहे.मात्र साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसून येत आहेत.खुल्या भुखंडांवर घाणीचे साम्राज्य आहे. गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधी पसरु लागली आहे.परिणामी साथ रोगाचा फैलाव होत आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू सारख्या आजाराची लागण होत असतांनाही मनपा प्रशासनाने अद्यापही परिसरात फवारणी,धुरळणी आणि अ‍ॅबेटिंग देखील केली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

शाळांची व्हॅन देखील येत नाही

ज्ञानदेवनगरात रस्ते नसल्यामुळे पायी चालणेही कठीन होत आहे.एक तर आधीच कच्चे रस्ते आणि त्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे असल्यामुळे वयोवृध्दांनाही त्रास सबन करावे लागत आहे.मुलांच्या शाळांची व्हॅन थेट घरापर्यंत येत नसल्यामुळे काही अंतरावर मुलांना आणण्यासाठी किंवा त्यांना व्हॅनपर्यंत सोडण्यासाठी जावे लागत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. मनपाची आतापर्यंत आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे वारंवार कारण दिले जात होते.मात्र आता तर मनपा कर्जमुक्त झाली आहे.तर मग विकासकामे का करीत नाही असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला.

पथदिव्यांअभावी परिसरात अंधार

परिसरातील काही भागात पथदिवे आहेत मात्र कधी सुरु असतात तर कधी बंद असतात. परंतु काही भागात पथदिवेच नाहीत.त्यामुळे परिसरात अंधार असतो.त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वीजेचे खांब उभारुन लाईट लावावेत अशी मागणी देखील येथील नागरिकांनी केली.अनेक समस्या आहेत मात्र मनपा प्रशासन अकार्यक्षम असल्यामुळे उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.

शहरापेक्षा खेडेगाव बरे

खेड्यापाड्यातील नागरिक मुलांच्या शिक्षणासाठी,नोकरीसाठी शहरात येतात. कारण शहरात सर्व सुविधा असतात अशी धारणा आहे. ज्ञानदेवनगरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास असूनही रस्ते नाहीत.गटारी नाहीत,काही ठिकाणी गटारी आहेत तर त्या नावालाच आहेत.पथदिवे नाहीत,साफसफाई होत नाही,शहरीकरणाच्या अशा कुठल्याच सुविधा नाहीत.त्यामुळे शहरापेक्षा खेडेगाव बरे आहे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.दरम्यान,मनपा प्रशासनाने आणि शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी प्रभागात येवून पाहणी करावी,आणि किमान मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी अपेक्षा ज्ञानदेवनगरातील नागरिकांनी व्यक्त केली.

Copy