पंपोरमध्ये दहशतवादी हल्ला; तीन जवान शहीद

0

श्रीनगर :  लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून आलेले हे दहशतवादी पळून गेले. त्यांचा कसून शोध घेण्यात येत होता. श्रीनगरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंपोर शहरातील कदलाबाल येथून हा लष्करी ताफा जात असताना हा प्रकार घडला होता. या घटनेनंतर लष्कराला सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.

पंपोरमध्ये दहशतवादी हल्ले सुरुच..
पुलवामा जिल्ह्यातील पंपोर शहरातून लष्करी ताफा जम्मू-श्रीनगर महामार्गाने दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जात होता. त्याचवेळी काही दुचाकीवरून दहशतवादी आले व त्यांनी लष्करी ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तसेच, अत्यंत वेगाने ते घटनास्थळावरून पळून गेले. लष्करी जवानांसह सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु, ते अचानक गायब झाले. रहिवासी परिसरात लष्कराने कसून शोधमोहीम हाती घेतली होती. पंपोर शहर हे दहशतवाद्यांसाठी नंदनवन झाले असून, या शहरात गेल्या वर्षभरात सर्वाधिक चकमकी झाल्या आहेत. दोन दहशतवाद्यांनी सरकारी इमारतीत तळ ठोकत तब्बल 60 तास लष्करी जवानांना झुंजविल्याची घटनाही नुकतीच घडली होती. त्यात या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

बस रोखण्याचा केला प्रयत्न
दहशतवाद्यांनी जेथे हल्ला केला तो रहिवासी परिसर असल्याने लष्कराला प्रत्युत्तर देण्यात मर्यादा आल्यात. तरीही या भागात मोठ्या प्रमाणात लष्करी शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. दहशतवाद्यांनी लष्करी वाहनाच्या चालकावर गोळीबार केला. त्याद्वारे बस थांबविण्याचा त्यांचा इरादा होता. त्याही परिस्थितीत चालकाने बस पळविल्याने या बसवर गोळीबार करून दहशतवादी पळून गेले. बस थांबवली गेली असती तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी शक्यता लष्करी अधिकार्‍यांनी वर्तविली.