Private Advt

पंधराशे रुपयांची लाच भोवली : पाचोर्‍यातील लाचखोर कृषी सहाय्यक जळगाव एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ/जळगाव : सबसीडीची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार विठ्ठल देवरे (रा.आनंद नगर, प्रतिभा फ्लोअर मिलजवळ, पाचोरा) यास जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी अटक केली. विशेष म्हणजे पाचोरा कृषी कार्यालयातच हा सापळा यशस्वी झाल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

कृषी कार्यालयातच स्वीकारली लाच
पाचोरा तालुक्यातील भोजे येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण (महाडीबीटी) योजनेंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पॉवर ट्रिलर आठ एचपीचे मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. हा अर्ज हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजुर झाल्याने बीसीएस पॉवर ट्रिलर खरेदी करण्यात आले व या योजनेंतर्गत मिळणारी 85 हजारांची सबसीडीची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे आरोपी ललितकुमार याने गुरुवार, 24 रोजी मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच गुरुवारी सायंकाळी आरोपीला लाच घेताच पथकाने अटक केली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ यांच्या पथकाने यशस्वी केला.