पंतप्रधान मोदी हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहीत नाही – राहुल गांधी

0

उदयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहीत नाही. असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. गीतेमध्ये काय म्हटले आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण मोदींना हिंदुत्वाबद्दल माहिती नाही. ते नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत ?, असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला आहे.

शनिवारी उदयपूरमधील व्यापारी वर्गाशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, खासगी शिक्षण संस्था चांगल्या असल्याचा हा एक गैरसमज आहे. सरकारच्या मदतीशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात पुढे जाता येणार नाही. मनमोहन सिंग सरकारच्या काळात तीन वेळा सर्जिकल स्ट्राइक झाले होते. सैन्याचे अधिकारी ज्या वेळी मनमोहन सिंग यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत गोपनीयता बाळगावी अशी विनंती केली होती. पण पंतप्रधान मोदी यांनी सैन्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये मोदींना पराभव दिसत होता. त्यामुळे मोदींनी सैन्याच्या कारवाईचा राजकीय लाभ घेतला, असेही राहुल यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आणि दोन लाख लोकांना उद्ध्वस्त केले, असा पुनरुच्चार करत पंतप्रधान मोदी तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरले, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.