पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली – काँग्रेस

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी केला आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पण दुपारी एक वाजता राजस्थान मधील अजमेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असल्याने निवडणूक आयोगाने घाईगडबडीने पत्रकार परिषदेची वेळ बदलली असा आरोप रणदीप सिंह सूरजेवाला यांनी केला.

निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम करतोय का ? असा सवालही सूरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार असून पंतप्रधान मोदीं ज्या राजस्थानमध्ये सभा घेणार आहेत तिथल्या सुद्धा निवडणूकांच्या तारखा आजच जाहीर होणार आहेत.

निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर झाल्यानंतर लगेच अचारसंहिता लागू होते. त्यावेळी राजकीय पक्षांवर काही बंधने येतात. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. तेलंगणामधील निवडणुकीच्या तारखाही आजच जाहीर होऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले.