पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा रद्द

0

दिसपूर: देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर आसाम राज्यातील जनतेने याला विरोध करत मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले होते. अद्यापही हे आंदोलन सुरु असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदी हे खेलो इंडिया यूथ गेम्सच्या उद्घाटनासाठी येणार होते. मोदींचा हा प्रस्तावित दौरा होता. मात्र हा दौरा रद्द करण्यात आला असून एका महिन्यात दुसऱ्यांदा असं घडलं आहे. नरेंद्र मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.

राज्य सरकारकडून यासंबंधी निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी युथ गेम्सच्या उद्घाटनासाठी येणार नाहीत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. यावेळी मोदींना २२ जानेवारीला होणाऱ्या सांगता समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात येण्यासंबंधी चर्चा होणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार असून काही नियोजित कार्यक्रम आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमधील कार्यक्रम एकाच दिवशी असल्याने आसामचा दौरा रद्द करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यूथ गेम्सचं उद्घाटन करणार होते. मात्र ती योजनाही रद्द करावी लागली आहे.
खेलो इंडिया यूथ गेम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतंही उत्तर देण्यात आले नव्हते. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू उद्घाटन सोहळ्यासाठी काही स्टार खेळाडूंसोबत उपस्थित असणार आहेत.

Copy