पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा

0

जळगाव (जनशक्ति चमूकडून) । नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय संपादन केला होता. यानंतर मंगळवारी जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांमध्ये सभापती आणि उपसभापतींची निवड झाली. यात अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली आहे. या पक्षाचा सर्वाधीक म्हणजे 10 पंचायत समित्यांवर झेंडा फडकला असून शिवसेनाला तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला एका ठिकाणी यश मिळाले आहे. सभापतीच्या निवडीत सर्वाधीक चुरस ही चाळीसगावमध्ये पहायला मिळाली. येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना समसमान जागा मिळाल्या होत्या. यामुळे सभापतींची निवड ही ईश्‍वरचिठ्ठीने करण्यात येईल हे निश्‍चित होते. मात्र येथे राष्ट्रवादीच्या एका सदस्याने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला. तर यावलमध्ये भाजपने ऐन वेळी अपक्ष उमेदवाराला सभापतीपदासाठी उभे केल्यानंतर काँग्रेसना भाजपच्या उमेदवाराला पाठींबा देऊन त्यांना निवडून आणले. जिल्ह्यात जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, रावेर, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव येथे भाजपची सत्ता आली असून शिवसेनेने धरणगाव, एरंडोल, भडगाव; राष्ट्रवादी काँग्रेसने पारोळा तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराने यावल येथे बाजी मारली. मंगळवारी प्रत्येक पंचायत समितीच्या सभागृहात सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया घेण्यात आली. ही निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या समर्थकांची प्रचंड जल्लोष केला. तर बहुतांश सभापती आणि उपसभापतींनी आपापल्या नेत्यांचे आशीर्वाद घेतले.

चाळीसगावात धक्कादायक निकाल
चाळीसगाव पंचायत समिती सदस्यांची निवडणूक झाल्यानंतर भाजप व राष्ट्रवादीला बहुमत मिळाले नसल्याने 7-7 जागांवर त्यांना समाधान मानावे लागले होते. यामुळे ही निवड ईश्वर चिठ्ठीने होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. सभापती पदासाठी भाजपच्या बहाळ गणाच्या सदस्या स्मितल दिनेश बोरसे व राष्ट्रवादी कडून पिंपरखेड गणाच्या सौ लता बाजीराव दौंड यांनी अर्ज सादर केले. तर उपसभापती पदासाठी भाजपचे संजय भास्कर पाटील पातोंडा गण व राष्ट्रवादीच्या रांजणगाव गणातील सौ सुनीता जिभाऊ पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात हात उंचावून मतदान करतांना राष्ट्रवादीच्या सदस्या सौ सुनीता जिभाऊ पाटील यांनी हात उंचावला नसल्याने भाजपचा मार्ग सुकर झाला. यामुळे सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे भाजपला मिळाली.

सभापती व उपसभापती
भुसावळ-सुनील नेहेते व मनीषा पाटील
जामनेर-संगीता पिठोडे व गोपाळ नाईक
यावल -संध्या किशोर महाजन व उमाकांत पाटील
चाळीसगाव-स्मितल बोरसे व संजय पाटील
पारोळा- सुनंदा पाटील व अशोक नागराज पाटील
रावेर-माधुरी गोपाळ नेमाडे व अनिताचौधरी
मुक्ताईनगर-शुभांगी भोलाणे व प्रल्हाद जंगले
बोदवड- गणेश पाटील व दिपाली राणे
जळगाव-यमुनाबाई रोटे व शितल पाटील
धरणगाव- मंजुषा पवार व प्रेमराज पाटील
एरंडोल-रजनी सोनवणे व विवेक पाटील
अमळनेर-वजाबाई भील व त्रिवेणीबाई पाटील
भडगाव-हेमलता पाटील व प्रताप सोनवणे
पाचोरा-सुभाष पाटील व अनिता पवार
चोपडा- आत्माराम म्हाळके व मच्छिंद्र पाटील