पंचांच्या खराब कामगिरीने गाजली २०-ट्वेंटी मालिका

0

बंगळुरु: भारत आणि इंग्लंडमध्ये झालेली २०-ट्वेंटी मालिका खराब पंचगिरीमुळे देखील चांगलीच गाजली. सामन्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा पंचांची खराब कामगिरी पाहायला मिळाली. नागपूर टी-20मध्येही शेवटच्या षटकात जो रुटबाबत खराब निर्णय देण्यात आला होता. त्यामुळे पंचांच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांकडून टीका होत आहे. तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात भारताला मोठा धक्का बसला. सलामीवीर विराट कोहली अवघ्या दोन धावांवर रनआउट झाला. त्यानंतर 8 व्या षटकात दुसरा सलामीवीर केएल राहुलही बेन स्टोक्सच्या चेंडूवर बोल्ड झाला, मात्र हा चेंडू नो बॉल होता.

दुसऱ्या सामन्याप्रमाणेच अंतिम सामन्यातही केएल राहुल पंचांच्या खराब निर्णयाचा बळी ठरला. ज्या चेंडूवर केएल राहुल बाद झाला तो चेंडू खरं तर ‘नो बॉल’ होता. पण पंचांचं स्टोक्सच्या नो बॉलकडे लक्षच गेले नाही. त्यामुळे राहुलला पव्हेलियनमध्ये परत जावे लागले. 8व्या षटकात केएल राहुलने शानदार फटकेबाजी केली. या षटकात राहुलने 2 चौकार आणि 1 षटकारही ठोकला. पण स्टोक्सला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात राहुल बोल्ड झाला. राहुल 22 धावांवर बाद झाला. पण याचवेळी पंच अनिल चौधरींचं स्टोक्सच्या नो बॉलकडे दुर्लक्ष झाले. रिप्लेमध्ये हा नो बॉल असल्याचे स्पष्ट झाले पण तोवर फार उशीर झाला होता. नागपूरच्या सामन्यात रूटच्या बाद होण्यावरून देखील इंग्लंडच्या संघाने नाराजी व्यक्त केली होती. नागपूरच्या सामन्यात शेवटच्या षटकात बुमराहने रुटला एलबीडब्ल्यू बाद केले. पण जेव्हा रिप्ले दाखवण्यात आला त्यावेळी रुट नाबाद असल्याचे स्षट झालं. हा सामना भारतानं 5 धावांनी जिंकला होता. कालच्या बंगळुरुमधील सामन्यातही भारतानं इंग्लंडवर 75 धावांनी दणदणीत विजय मिळवत टी-20 मालिका 2-1 नं खिशात घातली.