Private Advt

पंचक येथे धाडसी चोरी

चोपडा : तालुक्यातील पंचक येथे चोरट्यांनी मध्यरात्री सुमारे लाखाचा ऐवज लांबवला तर याचवेळी कुटुंबियांना जाग येताच चोरट्यांनी धूम ठोकली अडावद पोलिसांना चोरीची माहिती कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.

जाग येताच चोरट्यांनी ठोकली धूम
चोपडा तालुक्यातील पंचक येथील रहिवासी आकाश मनोहर पाटील हे आपल्या आई लताबाई आणि बहिण आरती यांच्यासह वास्तव्याला असून आकाश मावशीकडे गावाला गेल्याने घरात त्यांची आई लताबाई पाटील आणि बहिण आरती पाटील होत्या. सोमवार, 9 मे रोजी आई व मुलगी यांनी जेवण करून घराला आतून कडी लावून झोपल्या असताना 10 मे रोजी 4.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, 94 हजारांची रोकड, देव्हार्‍यात ठेवलेले चांदीचे देव आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, चोरटा आरतीचा मोबाईल लांबविण्याचा प्रयत्नात असताना मोबाईलला चार्जिंगला असल्याने आरती यांना जाग आली व त्यांनी आरडाओरड केली हे पाहून चोरटा पसार झाला.

अडावद पोलिसांची घटनास्थळी धाव
चोरीची माहिती मिळाल्यानंतर अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांच्यासह सुनील तायडे, जयदीप राजपुत, पंचक गावाचे पोलिस पाटील सतीश वाघ आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी श्वानपथक बोलून चौकशीला सुरुवात केली.