Private Advt

न्याहली गावाजवळ १ कोटीची दारू जप्त

नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नंदुरबार :  मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. यात 1 कोटी 14 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोडमध्ये आल्याने गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने नंदुरबार – दोंडाईचा रस्त्यावर वाहन पकडून कारवाई केली आहे. तालुक्यातील न्याहली गावाजवळ टाटा कंपनीचा पॅक बॉडी असलेला कंटेनर (क्र. MH- 46- F 4868) आल्याने त्या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्या वाहनामध्ये रॉयल ब्ल्यु व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकुण १ लाख ३६८० बाटल्या (२१६० बॉक्स) दिसुन आले. ही कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलमान्वये करण्यात आली. डी. एम. चकोर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, पी. जे. मेहता, दु. निरीक्षक, एस.एस. रावते दुय्यम निरीक्षक, पी. एस. पाटील दु.निरीक्षक सोबत जवान सर्वश्री अविनाश पाटील, भुषण एम.चौधरी, हितेश जेठे, वाहन चालक हेमंत पाटील, राजेंद्र पावरा, एम.एम. पाडवी, संदीप वाघ, हर्षल नांद्रे या पथकाने केली . गुन्ह्याचा पुढील तपास पी. जे. मेहता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक हे करीत आहेत.