न्यायालयाच्या परिसरात संशयिताचा गोंधळ

0

जळगाव : मोबाईल चोरी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयिताने गुरूवारी पोलीस आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करित असल्याच्या कारणावरून जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आरडा-ओरड करीत गोंधळ घातला. हा प्रकार सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास न्या. प्रतिभा पाटील यांच्या कोर्टाबाहेर घडला.

संशयित अमोल गोकुळ पाटील याला शहर पोलीसांनी मोबाईल चोरी प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्याच्यासह साथीदारांना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. याच दरम्यान, न्यायालयीन कोठडीत संशयित असतांना जामनेर पोलीसांनी चोरीच्या गुन्ह्यात संशयितांना ताब्यात घेण्यासाठी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार आज गुरूवारी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित अमोल गोकुळ पाटील याला पोलीसांनी न्या. प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात दुपारी हजर केले. मात्र, संशयिताने माझ्यावर पोलीस खोटे गुन्हे दाखल करीत असून माझ्या आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जोरजोरात आरोड्या मारून बोलून धिंगाणा घातला. यातच अमोल याने त्याच्या वडीलांशीही न्यायालयात हुज्जत घातली. यादरम्यान, न्यायालयाच्या आवारात बघ्यांची गर्दी जमली होती. उपस्थित पोलीसांनी अमोल याची समजूत घातल्यानंतर त्याला पोलीसांनी रिक्षातून जिल्हा कारागृह येथे नेले.