न्यायालयाच्या अवमान प्रकरणी प्रशांत भूषण दोषी

0

नवी दिल्ली: ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी वादग्रस्त ट्वीट करून सर्वोच्च न्यायालयाचे अवमान केले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. मात्र त्यांच्या शिक्षेवर २० ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी ट्वीटरवर टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्विटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

प्रशांत भूषण यांनी सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारेही ट्विट केले होते. हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

प्रशांत भूषण यांनी नोटीशीला उत्तर देताना मतांची अभिव्यक्ती कितीही स्पष्ट, मान्य न होण्यासारखी आणि काहीजणांसाठी अप्रिय अशी असली, तरी त्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकत नाही. माझे ट्विट न्यायाधीशांच्या वैयक्तिक वागण्यावर आहे, न्यायव्यवस्थेवर नाही असे स्पष्टीकरण दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांच्यासह ट्विटर कंपनीलाही नोटीस पाठविले होते. ट्विटरने भूषण यांचे दोन ट्वीट काढून का टाकले नाहीत, अशी विचारणा केली. त्यावर, न्यायालयाने आदेश दिला तर हे ट्वीट काढून टाकले जातील मात्र स्वत:हून ट्विटर ते काढून टाकू शकत नाही, असे स्पष्टीकरण ट्विटरकडून करण्यात आले.

Copy