नोव्हेंबरमध्ये सौदी अरेबिया करणार भारताला खनिज तेलाचा पुरवठा

0

मुंबई: जगातील सर्वात मोठा खनिज तेल निर्यातदार असलेला सौदी अरेबिया नोव्हेंबरमध्ये भारताला खनिज तेलाचा पुरवठा करणार आहे. इराणवर अमेरिकेने निर्बंध जाहीर केले आहेत. यासोबतच इराणशी व्यापार करणाऱ्या सर्व देशांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. त्यामुळे इंधनाची मागणी पूर्ण कशी होणार हा प्रश्न भारतासमोर होता. मात्र सौदी अरेबिया अतिरिक्त खनिज तेलाचा पुरवठा करणार असल्याने भारताची चिंता मिटली आहे. सौदी अरेबिया चार दशलक्ष बॅरल खनिज तेलाचा पुरवठा करणार आहे.

पेट्रोलियम पुरवठादार देशांची संघटना असलेल्या ओपेकमध्ये इराणचा तिसरा क्रमांक लागतो. इराणकडून सर्वाधिक खनिज तेलाचा पुरवठा चीनला होतो. यानंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र अमेरिकेनं बहिष्काराची धमकी दिल्यानं खनिज तेलाची गरज कशी भागवायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सौदी अरेबिया नोव्हेंबरमध्ये चार दशलक्ष बॅरल खनिज तेलाचा पुरवठा करणार असल्यानं भारताला दिलासा मिळाला आहे.

सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अराम्कोनं प्रतिक्रिया दिलेली नाही. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प, भारत पेट्रोलियन कॉर्प आणि मँगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडनं नोव्हेंबरमध्ये 1 मिलियन बॅरल खनिज तेल मिळावं, अशी मागणी सौदी अरेबियाकडे केली होती. अमेरिका 4 नोव्हेंबरपासून इराणवर निर्बंध लादणार आहे. मात्र यानंतरही भारत इराणकडून खनिज तेलाची खरेदी सुरुच ठेवेल, अशी भूमिका पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी मांडली होती.

Copy