नोटेवर कमळ कशाला?

0

लखनऊ । अखिलेश यादव यांच्या सरकारला सहा महिन्यांचा कालावधी झाल्याबद्दल सुरू करण्यात आलेल्या समाजवादी रुग्णवाहिका सेवा या रुग्णवाहिकेवर लिहिण्यात आलेल्या समाजवादी हा शब्द झाकून ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होता. आयोगाच्या या निर्णायावर टीकेचा सूर लावताना, 2000 च्या नोटेवर कमळ, हत्ती आणि मोराचे चित्र आहे. कमळ हे भाजपचे चिन्ह आहे. मग 2000 च्या नोटेवर कमळ कशाला? असा सवाल कनोजच्या खासदार आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या डिंपल यादव यांनी निवडणूक आयोगाला करत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात राज्यातील भाजपचे नेते जे.पी.एस. राठोड यांनी राज्याचे मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केली होती. शासकीय रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सरकारी पैशाने सत्ताधारी पक्षाचा प्रचार केला जात असल्याचे या तक्रारीत राठोड यांनी म्हटले होते. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने सरकारी रुग्णवाहिकांवर असलेला समाजवादी हा शब्द झाकायला सांगितला होता. निवडणूक आयोगाच्या या सूचनेवर प्रतिक्रिया देताना डिंपल यादव म्हणाल्या की, रुग्णावाहिकेवरील समाजवादी शब्द झाकण्यास सांगितले आहे. 2000 च्या नोटेवर असलेले कमळ काय करतेय?.
अखिलेश यादव यांच्या सरकारने सुरू केलेल्या या रुग्णवाहिकेसाठी टोल फ्री 108 क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर फोन केल्यास 24 तास ही सेवा मिळू शकते.