नोटाबंदीचा निर्णय फसला; विरोधकांचा हल्लाबोल!

0

नवी दिल्ली : नोटाबंदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप अशा मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी मंगळवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत, नोटाबंदीचा निर्णय अपयशी ठरल्याचा आरोप केला. तथापि, विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या या बैठकीला डावे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जनता दल (संयुक्त) हे पक्ष मात्र सहभागी झाले नाहीत. यावेळी राहुल गांधी यांनी नोटाबंदी म्हणजे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेले पाऊल आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला होता. मात्र सत्य हे आहे, की नोटाबंदीने कोणत्याही प्रकारे काळापैसा कमी झालेला नाही. उलटपक्षी त्यामुळे काळाबाजार वाढला. रोकड बदलविण्यासाठी एक नवाच काळाबाजार निर्माण झाला असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. तर आता 50 दिवसानंतरही देशातील परिस्थिती जैसे थेच असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का? असा खडा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

50 दिवसांची मुदत संपली, परिस्थिती कुठे सुधारली?
ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचार्‍यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी विविध पळवाटा काढल्याने नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, मोदींनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपत आली तरी देशातील परिस्थिती सुधारलेली नाही, असे टीकास्त्र या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर डागले. देशातील गोरगरीब आणि शेतकर्‍यांना मात्र या हेकेखोर निर्णयामुळे त्रास होत आहे, असा आरोपही यावेळी राहुल गांधी व ममता बॅनर्जी यांनी केला. नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह राजद आणि डीएमकेचे नेते उपस्थित होते.

मोदी सरकार कॅशलेसवरून बेसलेस झाले?
नोटाबंदीवरुन सरकारविरोधात सुरुवातीपासूनच आघाडी उघडणार्‍या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींवर कठोर शब्दात टीका केली. मोदी आणि नोटाबंदी विरोधात विरोधी पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, नोटाबंदीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत, मोदींनी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते. ते हेच अच्छे दिन का? नोटाबंदीमुळे देश 20 वर्षे मागे गेला असून, गोरगरीब जनता उपाशीपोटी राहिली तरी नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला नाही, असा घणाघातही त्यांनी केला. मोदी सरकार कॅशलेसवरून बेसलेस झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. नोटाबंदीसारखा मोठा निर्णय घेताना सरकारने संसदेला विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. डावे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि संयुक्त दनता दल हे पक्ष या बैठकीत सहभागी झाले नाहीत.

डिजिटायझेशनसाठी राजीव गांधींना क्रेडिट
राजीव गांधी यांनी दूरसंचारक्षेत्र मजबूत केले. डिजिटायझेशन आज नव्हे तर 20 वर्षांपासून होत आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. आम्ही काही बोलायला गेलो तर कुछ मत बोलो, गब्बर आ जायेगा, असे धमकावले जाते. हे काय आहे? सर्वांना ते भीती दाखवत आहेत. परदेशात काळा पैसा आहे, तिकडून काहीच आले नाही. सर्व काळा पैसा बँक खात्यात जमा झाला. परदेशातून पैसा आणून जनतेच्या खात्यात भरा आम्ही समर्थन देऊन, असेही बॅनर्जी यांनी सांगितले.

काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष; भाजपचा पलटवार!
नोटाबंदीवरून विरोधी पक्षांनी टीका केल्यानंतर भाजपनेही पत्रकार परिषद घेऊन या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. काँग्रेस आणि राहुल गांधी हे भ्रष्टाचाराला चिथावणी देत आहेत. हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. संपूर्ण देश सरकारच्या बाजूने उभा असताना पंतप्रधानांचा राजीनामा का मागितला जात आहे? असा खडा सवाल भाजपच्यावतीने केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला. मोदी सरकारच्या निर्णयाचा त्रास कोणाला आणि का होत आहे, हे आज विरोधकांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमुळे स्पष्ट झाले आहे. जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. भ्रष्ट लोकांचे पितळ उघडे होत असून, पंतप्रधानांनी उचललेल्या पावलामुळे विरोधकांना जास्त त्रास होत असल्याची टीकाही प्रसाद यांनी केली. विरोधी पक्षाच्या बैठकीला डाव्यांची गैरहजेरी पाहाता, विरोधकांच्या एकतेचा फुगाही फुटला असल्याचेही प्रसाद म्हणाले.