Private Advt

नोकरीसाठी तीन लाख रुपये न आणल्याने मारूळच्या विवाहितेचा छळ

निंभोरा : यावल तालुक्यातील मारूळ येथील विवाहितेने पतीला वीज कंपनीत नोकरी लावण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये न आणल्याने तसेच मुलाला नणंदेला दत्तक न दिल्याने मारहाण करण्यात आली तसेच छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सहा जणांवर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा
काजल निलभूषण मेढे (20, रा.मारूळ, ह.मु.विवरा खुर्द, ता.रावेर) यांचा विवाह यावल तालुक्यातील मारुळ येथील निलभूषण पांडुरंग मेढे यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. दरम्यान पती निलभूषण मेढे याने लग्नात मान-सन्मान केला नाही आणि वीज कंपनीत नोकरी लावण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणले नाहीत या मागणीसाठी विवाहितेला शिविगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर सासू, दीर व दोन नणंद यांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता काजल मेढे या माहेरी निघून आल्या. यासंदर्भात सोमवार, 13 डिसेंबर रोजी दुपारी निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती निलभूषण पांडुरंग मेढे, सासू लक्ष्मीबाई पांडूरंग मेढे, दीर निलंबर पांडूरंग मेढे, नणंद सावित्री राहूल नराळे, दीर सत्यम पांडूरंग मेढे आणि नणंद भाग्यश्री सुरेश वाघ (सर्व रा.मारूळ, ता.यावल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विकास कोल्हे करीत आहे.