नेरीतील वीज कंपनीचा अभियंता एसीबीचा ट्रॅपची कुणकुण लागताच पसार

गणेश वाघ

As Soon As The Trap Was Suspected, A Bribe From The Assistant Engineer Of The Electricity Company Came From Jamner भुसावळ : शेतजमिनीवर लघू उद्योग सुरू करण्यासाठी 25 केव्हीएची डीपी एनएससी मोफत योजनेंतर्गत मंजूर करून देण्यासाठी सहा लाखांची लाच मागणी करून ती स्वीकारताना ट्रॅप आल्याचा संशय येताच पहूरचे कनिष्ठ अभियंता हेमंत शालिग्राम पाटील (42, शिवाजी नगर, जामनेर) याने एसीबी पथकाला गुंगारा देत धूम ठोकली. गुरुवार, 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जामनेरच्या शिवाजी नगर भागात घडलेल्या या घटनेने वीज कंपनीतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. रात्री उशिरा आरोपीविरोधात लाच मागणी प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍यांदा आरोपीला आला ट्रॅपचा संशय
29 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांना लघू उद्योग सुरू करण्यासाठी वीज रोहित्राची (डीपी) आवश्यकता असल्याने त्यांनी कनिष्ठ अभियंता हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला होता मात्र पाटील यांनी 25 केव्हीएची डीपी एनएससी मोफत योजनेंतर्गत मंजूर करून देण्यासाठी सहा लाखांची लाच मागणी केली व तक्रारदाराने ती देण्याचे मान्य करीत औरंगाबाद एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने 15 व 17 जून रोजी लाचेची पडताळणी करून सापळा रचला व पथक जामनेरात धडकले. आरोपीने तक्रारदाराला घरी बोलावल्यानंतर त्यास गतवेळी संशय येताच त्याने तक्रारदाराला घराबाहेर बोलावले व दोन जागाही बदलल्या व अन्य नातेवाईकांना फोन करून लाचेची रक्कम देण्याचे सांगितले मात्र आरोपीच्या नातेवाईकाला तक्रारदारासोबत असलेल्या पंचावरच संशय आल्याने त्यांनी त्यावेळी लाच स्वीकारली नाही.

गुरुवारी पथकाला धक्का देत आरोपीचे चारचाकीतून पलायन
गुरुवारी आरोपी हेमंत पाटील याने लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर तक्रारदार ठरल्या जागेवर पोहोचला मात्र ट्रॅप आल्याचे लक्षात येताच चारचाकीतून एसीबीच्या पथकासमोरच धूम ठोकली. यावेळी पथकाने आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या तावडीतून निसटत भूमिगत झाला. जळगावहून एसीबीची टीम मदतीसाठी आल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत आरोपीचा शोध घेण्यात आला मात्र तो न गवसल्याने रात्री उशिरा एसीबीने जामनेर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

यांनी रचला होता सापळा
औरंगाबाद पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक मारूती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, हवालदार राजेंद्र जोशी, राजेंद्र सीनकर, अशोक नागरगोजे, विलास चव्हाण, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने सापळा रचला.