नेब कॉलनीत पावणे दोन लाखांची घरफोडी

0

भुसावळ : भावाकडे जेवायला गेल्याची वेळ साधुन चोरट्यांनी औषध विक्रेत्याचे घर फोडुन सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा पावणे दोन लाखांवर डल्ला मारला. ही घटना जामनेर रोडलगत नेब कॉलनीत गुरुवार 22 रोजी संध्याकाळी उशीरा घडली. पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण केले असता श्‍वानाने घटनास्थळापासून जामनेर रस्त्यावरील रिक्षा स्टॉपपर्यंत मार्ग दाखविला.

शहरातील बंब कॉलनी रोडवरील नेब कॉलनीतील रहिवासी महेंद्र जैन हे आपल्या कुटुंबासह यशोधन पार्कमध्ये राहाणार्‍या भावाच्या घरी जेवण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता गेले होते. जेवण आटोपुन रात्री दहाला पुन्हा आपल्या घरी आले तर घराच्या दरवाजाला आतुन कडी लावलेली दिसली.

चांदीची भांडी सुखरुप
ते पाहून आश्‍चर्यचकीत झालेल्या जैन यांनी दरवाजा तोडुन आत प्रवेश केला, तेव्हा घरातील तीन खोल्यांमधील कपाटे आणि सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसुन आला. मुख्य कपाटात ठेवलेले 85 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकुन एक लाख 62 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे लक्षात आले. त्यावरुन महेंद्र जैन यांनी तात्काळ बाजारपेठ पोलिसांकडे धाव घेतली व गुन्ह्याची नोंद केली आहे. याघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे चोरट्यांनी चांदीची भांडी आणि वीस, दहा रुपयांच्या चलनी नोटांचे बंडल घटनास्थळी सोडलेले दिसुन आले. चोरटे घराच्या मागील बाजुला कुंपणाच्या भिंतीवर बसवलेल्या लोखंडी जाळीला असलेली दोन बाय दोनच्या खिडकीला लावलेले कुलुप तोडुन मध्ये आले. त्यानंतर किचन रुमचा लाकडी दरवाजा तोडुन घरात प्रवेश केला आणि ऐवज चोरुन नेला.