नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे विधान करु नये – राहुल गांधी 

0

नवी दिल्ली : राजस्थानमधील काँग्रेस नेते सी पी जोशी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसची गोची झाली असतानाच शेवटी राहुल गांधी यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ‘सी पी जोशी यांचे विधान हे काँग्रेस पक्षाच्या आदर्शांविरोधात आहे. पक्षाच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे विधान करु नये’, अशी तंबीच राहुल गांधी यांनी नेत्यांना दिली आहे.

नाथद्वारा येथे आयोजित प्रचारसभेत सी पी जोशी यांनी नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जात आणि धर्मावर प्रश्न उपस्थित केले आहे. धर्माबद्दल फक्त ब्राह्मणांनाच माहित असते, असेही त्यांनी म्हटले होते. सी पी जोशी यांच्या वक्तव्यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले होते. सी पी जोशी यांनी राजकारणात खालची पातळी गाठली, अशी प्रतिक्रिया भाजपाकडून येत होती. तर काँग्रेसने याबाबत भाष्य केले नव्हते.

अखेर राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विटरद्वारे सी पी जोशी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ‘सी पी जोशी यांचे विधान काँग्रेसच्या आदर्शांविरोधात आहे. नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही विधान करु नये. काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करुन जोशी यांना त्यांची चूक लक्षात येईल, त्यांनी या विधानासाठी खेद व्यक्त केला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Copy