Private Advt

नेत्यांचं ठरलं… जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल

जागा वाटपासाठी आठ सदस्यीय कोअर कमिटी

जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा असे चारही पक्ष मिळून सर्वपक्षीय पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत माजी मंत्री एकनाथराव खडसे व भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांच्याशी मुंबई येथे चर्चा केली होती. त्यानुसार पालकमंत्री ना. पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची सोमवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, डी.जी. पाटील, उदय पाटील, राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, संतोष चौधरी, आमदार अनिल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, भाजपाकडून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, शिवसेनेकडून पालकमंत्र्यांसह आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील हे उपस्थित होते.
महाजनांना उशीर अन तर्कवितर्क
पालकमंत्र्यांनी दुपारी ४ वा. सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते बैठकीसाठी विश्रामगृह येथे उपस्थित झाले होते. मात्र भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन हे हजर नव्हते. त्यामुळे महाजन बैठकीला उपस्थित राहतील की नाही असे तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर भाजपाच्या आमदारांसोबत बैठक असल्याने येण्यास उशीर झाल्याचे आमदार महाजन यांनी स्पष्ट केले.
सर्वपक्षीयचा निर्णय ठरला
बैठकीबाबत बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारात चिन्हावर निवडणूका लढविल्या जात नसल्याने सर्वपक्षीय पॅनल व्हावे अशी सगळ्यांचीच इच्छा होती. त्यानुसार आज प्राथमिक बैठक घेण्यात आली असून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
जागा वाटपासाठी आठ जणांची समिती
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होणार असून सर्वपक्षीय पॅनल करतांना जागा वाटपासाठी आठ सदस्यीय कोअर कमिटी तयार करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. या कमिटीत भाजपाकडून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे, शिवसेनेकडून स्वत: पालकमंत्री व आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे व गुलाबराव देवकर, काँग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी व अ‍ॅड. संदीप पाटील यांचा समावेश राहणार आहे. मतदार यादी प्रसिध्द होण्याआधी या कमिटीच्या बैठका घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.