नेट’पाठोपाठ ‘आयआयटी’च्या ‘गेट’ मध्येही पार्थ यादवला विशेष फेलोशिप

जळगाव :  पार्थ चंद्रकांत यादव याने पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘नेट’पाठोपाठ मुंबई ‘आयआयटी’च्या ‘गेट’ परीक्षेतही विशेष प्रावीण्यासह फेलोशिप प्राप्त केली आहे.
निगेटिव्ह (मायनस) मार्क्स सिस्टिम असलेल्या या परीक्षेचा शिष्यवृत्ती निकाल 41 वर बंद झालेला असून, पार्थ यादवचा स्कोअर 60 राहिलेला आहे. ‘नेट’ परीक्षेत पार्थने तब्बल 99.75 पर्सेंटाईल मिळवले होते. नेटमध्ये जवळपास शंभर टक्के गुण मिळविल्यानंतर निगेटिव्ह गुणांकन पद्धत असतानाही गेट परीक्षेत पार्थने इतके गुण मिळविणे, ही बाब जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
गेट फेलोशिपसह उत्तीर्ण केल्यास पुढील शिक्षणासाठी मासिक शिष्यवृत्ती दिली जाते. पार्थ सध्या हैदराबाद येथील ‘फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी’तून इंग्रजी या विषयात पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसर्‍या वर्षाला आहे… आणि गेट परीक्षा सन 2021 पासूनच म्हणजे चालू वर्षापासूनच पर्यावरण विज्ञान, तत्वज्ञान, लिंग्विस्टिक या विषयांसाठीही खुली झालेली आहे. यापूर्वी मुंबई आयआयटीतर्फे घेतली जाणारी ही परीक्षा केवळ अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी होत असे.
पार्थ यादव याला विशेष संशोधनासाठी आधीच ‘नेट’च्या माध्यमातून ‘रिसर्च फेलोशिप’ जाहीर झालेली आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होताच ‘आयआयटी’मधून माझा संशोधन प्रकल्प मी पूर्ण करेन, असे पार्थने सांगितले.