नुकसान भरपाईबाबत वेगळे निकष

0

सिंधुदुर्ग । बांदा ता. सावंतवाडी परिसरात जे चक्रीवादळ झाले त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी फलोद्यान जिल्हा म्हणून मुख्यमंत्र्यांनी वेगळे निकष लावण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. ज्या गावात पूर्ण अथवा अंशतः नुकसान झाले आहे तेथील पंचनामे दोन दिवसात करुन नरेगा अंतर्गत तीन ते चार वर्षांची झाडे देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन, वीज पुरवठा व पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, वीज वितरण विभागाचे मुख्य अभियंता चंद्रशेखर पाटील, कुडाळचे कार्यकारी अभियंता श्री.वेलुकर उपस्थित होते.

पाणी पुरवठ्याचा घेतला आढावा : पाणी पुरवठ्याच्या किती योजना पूर्ण झाल्या आहेत, किती अपूर्ण आहेत, ठेकेदारांच्या काय अडचणी आहेत, याचा आढावा दर आठवड्याला घेऊन टंचाई अंतर्गत ज्या ठेकेदारांनी कामे पूर्ण केलेली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. विंधन विहिरीसाठी जेवढी जागा लागेल तेवढ्याच जमिनीचे बक्षीसपत्र करून घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अशा विहिरींची कामे मार्गी लागतील असेही यावेळी सांगितले.

पंचनामे दोन दिवसात
बांदा परिसरात चक्रीवादळ झाल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, त्या गावात केंद्र शासनाच्या नरेगा योजनेअंतर्गत फळ झाड तसेच खड्डा खणणे आदिसाठी मदत केली जाणार आहे. यासाठीचे पंचनामे दोन दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधीत विभागाकडून या वादळात फळझाडांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने देण्याच्या सुचनाही श्री.केसरकर यांनी यावेळी केल्या. देवगड तालुक्यात कातळ जमिनीमुळे सर्वाधिक पाणी टंचाईचा फटका बसतो.

सर्व कर्मचार्‍यांना सहभागाचे आवाहन
आपत्ती व्यवस्थापनामध्ये ग्रामपातळीवर अंमलबजावणी होते की नाही, शेवटच्या स्तरापर्यंत कर्मचारी सहभागी होतो की नाही याचे सर्वेक्षण करण्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यातील तांबोळी, वाफोली, बांदा व विलवडे येथे चक्रीवादळामुळे विजेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा अहवाल कार्यकारी अभियंत्यांनी दोन दिवसात द्यावा व वीज जोडणीची आवश्यक ती कामे तातडीने करून विद्युत पुरवठा पूर्ववत करावा, असेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी विजेच्या संदर्भातील सर्व कामे पूर्ण करावीत तसेच वीज गेल्यास ती पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.