नीलगायीच्या धडकेत आसोदा येथील तरुण ठार

जळगाव । तालुक्यातील शेळगाव-भादली रस्त्याने मित्राची मोटारसायकल घेऊन सोमवारी रात्री बाहेर निघालेल्या आसोदा येथील तरुणाच्या वाहनाला निलगायीने धडक दिली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले.
आसोदा येथील श्याम शांताराम कोळी (वय 36) हा तरुण सोमवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास मित्राची  बुलेट मोटारसायकल घेऊन काही कामानिमित्त बाहेर गेला. शेळगाव रस्त्याने जात असताना भरधाव वेगातील निलगायीने वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात श्याम कोळी मोटारसायकलवरुन पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वाजता त्या रस्त्याने शेतात जाणार्‍या शेतकर्‍यांच्या लक्षात आली. याबाबत त्यांनी गावातील काही जणांना कळविले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मयत श्याम कोळी याचे वडील आसोदा ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला आहे. या घटनेबाबत कळताच नातेवाईकांनी आक्रोश केला. याबाबत भादली येथील पोलीस पाटील अ‍ॅड.राधिका ढाके यांनी खबर दिली. त्यावरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.