‘नीट’ परीक्षा केंद्रावर मुलीची अंतर्वस्त्र उतरवली

0

कन्नूर । नीटच्या परीक्षेसाठी करण्यात आलेल्या कडक नियमांचे पालन करताना अतिरेक करण्यात आल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. कन्नूरमधील परीक्षा केंद्रावर गेलेल्या महिला परीक्षार्थीला अधिकार्‍यांनी परीक्षेला बसण्याआधी अंतर्वस्त्र काढायला सांगितली. तशी माहिती एका महिला परीक्षार्थीने दिली. यासोबतच इतरही काही महिला परीक्षार्थींनादेखील अशाच प्रकारचा अनुभव आला. सरकारी आणि खासगी महाविद्यालयांतील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी रविवारी ‘नीट’ची परीक्षा झाली.

ऐनवेळी नवे ड्रेस आणून घालावे लागले
‘माझी मुलगी परीक्षा केंद्रावर गेली. त्यानंतर ती बाहेर आली आणि तिने मला तिची अंतर्वस्त्र दिली,’ असे परीक्षा केंद्राबाहेर थांबलेल्या एका आईने सांगितले. यासोबतच एका दुसर्‍या महिला परीक्षार्थीला तिने परिधान केलेल्या कपड्यांवरील पॉकेट्स आणि मेटलची बटणे काढायला सांगितली. ‘तिने जीन्स घातली होती. त्या जीन्सला पॉकेट्स आणि आणि मेटलची बटणे होती. त्यांनी तिला पॉकेट्स आणि बटणे काढायला सांगितली. त्यानंतर मी परीक्षा केंद्रापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या एका दुकानात गेलो. ते दुकान उघडण्याची वाट पाहिली आणि तिथून एक नवा ड्रेस घेऊन आलो,’ अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली. नीट परीक्षा केंद्राजवळ राहणार्‍या काही लोकांनी महिला परीक्षार्थींना ‘परीक्षा योग्य’ कपडे उपलब्ध करून दिली.

‘परीक्षा केंद्रावर अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक मिळाल्यावर किती मुलींना व्यवस्थित परीक्षा देता आली, मुलींचे लक्ष विचलित झाले का, त्यांना संपूर्ण लक्ष केंद्रित करून परीक्षा देता आली का, या सर्व मुदद्यांवर चर्चा होऊ शकते. याप्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना पत्र लिहिणार असून या सगळ्याला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी करणार आहे,’ असे केरळच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिंदू कृष्णा यांनी म्हटले.