Private Advt

निविदा न काढताच केले चेन लिंक फॅन्सिंगचे काम : मुरबाड धसई गावातील अजब प्रकार

टोकावडे दक्षिण वनविभागाची अनागोंदी चव्हाट्यावर : ठेकेदारावर दबाव टाकून करून घेतल्याची चर्चा तर अधिकार्‍यांचे मात्र कानावर हात

मुंबई : ठाणे येथील वन विभागातील टोकावडे दक्षिण रेंजमध्ये मुरबाड तालुक्यातील धसई गावात अजब प्रकार घडल्याचे समोर आले आहे. टोकावडे दक्षिण या वन विभागाच्या रेंज ऑफिसने कोणतेही लेखी आदेश न देता ठेकेदाराकडून चेन लिंक फेन्सिंगचे काम करून घेतले मात्र हे काम कोणतीही निविदा प्रक्रिया वा खरेदी प्रक्रिया न राबवता ठेकेदारास करण्यास भाग पाडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे शिवाय याबाबत टिकेची झोड उठताच रेंज ऑफिसर यांनी कानावर बोट ठेवत त्यांच्याकडून उडवा-उडवीचे उत्तर दिले जात असल्याची धक्कादायक समोर आली आहे.

निविदा प्रक्रियेविनाच झालेल्या कामामुळे वनविभागाच्या वाढल्या अडचणी
ठाणे वनविभागातील वनपरीक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे (टोकावडे दक्षिण) यांनी धसई येथील निवासस्थानाभोवती संरक्षण कुंपणाचे काम निविदा प्रक्रियेविनाच केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अधिकार्‍यांच्या दाव्यानुसार, हे काम हे ठेकेदाराने जबरदस्तीने करून दिले आहे मात्र काम करणार्‍या ठेकेदारांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी मात्र हे काम कुठलीही निविदा प्रक्रिया न राबवता व कुठलेही कार्यारंभ आदेश न देता वनपरीक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी करावयास भाग पाडल्याने केल्याचा दावा केला आहे. माझ्यावर विश्वास नाही का ? असे म्हणून तब्बल 24 लाख रुपये खर्चाचे काम ठेकेदारास करण्यात लावण्यात आले असून आता अडचणी वाढताच अधिकार्‍यांनी या प्रकारातून अंग काढून घेण्याचा प्रकार केल्याचा आरोप होत आहे.

अधिकार्‍यांच्या अडचणीत वाढ
झालेल्या कामानंतर होत असलेल्या टिकेनंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचारी गोटात खळबळ उडाली असून सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तविक नियमानुसार, कोणत्याही कामापूर्वी ई-निविदा प्रक्रिया होणे गरजेचे असताना वनविभागाच्या अधिकार्‍यांनी मात्र नियम धाब्यावर बसवून स्वतः ठेका दिल्याप्रमाणे ठेकेदार यांच्याकडून काम करून घेतल्याने या अधिकार्‍यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचे बोलले जात आहे. मी वारंवार त्यांना काम करू नका असे, म्हणत होतो तरी ते काम पूर्ण करण्यात आलेले आहे, असा या अधिकार्‍यांचा दावा असलातरी तो हास्यास्पद असल्याचा आरोपही या निमित्ताने होताना दिसून येत आहे. हे काम करण्यात आल्यानंतर मात्र ठेकेदाराची आर्थिक अडचण वाढली आहे. दरम्यान, याच वनपरीक्षेत्र अधिकार्‍यांची मजुरांची मजुरी वाटपात 2020 मध्ये अफरातफर केल्याबाबत चौकशी सध्या सुरू आहे. हे देखील तितकेच विशेष !