निवडणूक लढवण्यासाठी बाहेरच्या शहाण्यांची गरज नाही -आमदार अनिल गोटे

0

मार्मिक टोल्याने राजकीय गोटात खळबळ ; बंड केले तर सर्वांना थंड करण्याचा सूचक इशारा

धुळे- मी लोकसंग्रामकडून निवडणूक लढेल, विकास आघाडी स्थापन करेल असे काहींना वाटत आहे पण आपल्या रक्तारक्तात भाजप भिनलेला असून आमचा झेंडा भाजपचाच राहणार आहे. निवडणूक कशी लढवायची हे शिकविण्यासाठी बाहेरच्या शहाण्याची गरज नाही, असा मार्मिक टोला कुणाचेही नाव न घेता आमदार अनिल गोटे यांनी येथे दिला. भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पांझरा चौपाटीवरील स्व़ उत्तमराव पाटील यांच्या स्मारकाशेजारी मंगळवादी दुपारी 12 वाजता झाला़ याप्रसंगी गोटे बोलत होते. ते म्हणाले की, मला बंड करायला भाग पाडू नका, मी बंड केले तर सर्वांना थंड करून टाकेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीसाठी ज्या दिवशी आचारसंहिता लागेल, त्याच्या दुसर्‍या दिवशी शिवतिर्थावर भव्य सभा होईल व त्यात महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल.

भाजपाच्याच एकाने चौपाटी पाडण्यासाठी आणला दबाव
आमदार गोटे म्हणाले की, महापालिकेत सत्ता आल्यास 532 किमी रस्त्यांची कामे, दररोज पाणी दिले जाईल. एकाही पक्षाची दादागिरी चालू देणार नाही. आमच्याच पक्षाचा एक जण दिल्लीतून अधिकार्‍यांना रात्रभर फोन करून चौपाटी पाडण्यास सांगत होता, असा गौप्यस्फोट करीत त्यांनी स्वपक्षाच्या नेत्यांनाही लक्ष्य केले़ शहरात एका बाबाला केवळ माती टाकायच्या पाट्या माहित असल्याचे आमदार गोटे म्हणाले़ माझ्याकडे इच्छुकांचे 317 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 261 उमेदवार पदवीधर असल्याचेही गोटे यांनी म्हणाले.

यांची होती मेळाव्याला उपस्थिती
या मेळाव्याला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, भीमसिंग राजपूत, तेजस गोटे, अ‍ॅड.अमित दुसाणे, अमित खोपडे, शिरीश शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ भाजपच्या महानगरप्रमुखांसह प्रमुख कार्यकर्त्यांची अनुपस्थिती दिसून आली. भाजपाच्या मेळाव्याला इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Copy