Private Advt

निवडणूक रणधुमाळी : रावेर तालुक्यात पंचरंगी लढत रंगणार

आगामी जिल्हा परीषद व पं.स. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आखल्या व्यूह रचना : निवडणूक चुरशीची होणार

रावेर (शालिक महाजन) : रावेर तालुक्यात लवकरच निवणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. विकासकामे, जातीय समीकरण आर्थिक सक्षम असणार्‍या उमेदवाराला पक्ष प्राधान्य देत असल्याने यंदाच्या निवडणुकीत रावेर तालुक्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा व प्रहार जनशक्ती पार्टीला अशी पंचरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्ष जिल्हा परीषदेत आपले उमेदवार जास्तीत-जास्त निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत तर काही हिशोब चूकते करण्यासाठी भाग घेणार आहे.

गण व गटांसाठी होणार निवडणूक
येत्या काही दिवसात सात गट व 14 गणांसाठी निवडणूक होणार असून त्याची रचना अद्याप बाकी आहे. ग्रामीण भागात जिल्हा परीषदेला पूर्वीपासुन विकास कामांसोबत जातीय समीकरणानुसार उमेदवारी देण्याची प्रथा आहे. फक्त रावेर तालुक्याचा विचार केला तर मराठा, लेवा पाटील, गुजर समाजाचा प्रभाव आहे. त्या खालो-खाल इतर अल्प अल्पसंख्यांक समाजाची मते येतात. ही मतेदेखील निर्णायक मतांमध्ये आहे. गेल्या पाच वर्षात पुला खालून बरेच पाणी वाहुन गेले असून यंदाची निवडणुक भविष्याच्या राजकीय दृष्टीने महत्वाची असणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीपासून मराठा समाजात प्रचंड खदखद आहे. याचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला नुकसान ? यावरदेखील बरीच गणिते अवलंबून असणार आहे.

2017 मध्ये भाजपाकडे होता जनादेश
2017 च्या जिल्हा परीषद निवडणूकांमध्ये भाजपाने चार जागा जिंकल्या व. एकूण सहा जागा लढविल्या होत्या त्यांना एकूण 49 हजार 806 मते मिळाले त्यानंतर शिवसेनाने पाच जागा लढविल्या. एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही परंतु त्यांना भाजपानंतर 27 हजार 163 मते मिळाली. त्यानंतर काँग्रेस पक्षाने पाच जागा लढविल्या त्यातील एक जागा जिंकली त्यांना पाचही ठिकाणी 24 हजार 199 मते मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन जागा लढविल्या होत्या. त्यातील एक जागा जिंकली त्यांना तीन जागी 19 हजार 473 मते मिळाली होती.

रावेर तालुका राजकीयद़ृष्ट्या महत्वाचा
राजकीयद़ृष्ट्या महत्वाचा असलेल्या रावेर तालुक्यातून जास्तीत-जास्त काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरींच्या खांद्यावर असेल तर भाजपाचा गड अभेद्य ठेवण्याची जबाबदारी नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन, सुरेश धनके, प्रल्हाद पाटलांच्या टीमवर असेल तर राष्ट्रवादीची जबाबदारी माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार अरुण पाटील, नीळकंठ चौधरींच्या खांद्यावर असेल तर शिवसेनेची जबाबदारी आमदार चंद्रकांत पाटील, प्रवीण पंडीत, रवींद्र पवारांच्या खांद्यावर असणार आहे. तर प्रहार जनशक्ती पार्टीच्या उमेदवारांची जबाबदारी अनिल चौधरींच्या खांद्यावर असणार आहे.

माजी आमदारांच्या भूमिकेकडे असेल लक्ष
जिल्हा बँक निवडणुकीत विश्वासघाताचे शिकार झाले तेव्हापासून माजी आमदार अरुण पाटील चुप्पी साधुन आहे. पाटील यांचा मराठा समाजात मोठा प्रभाव आहे. आगामी निवडणुकीत माजी आमदार पाटील आपली ताकद कोणत्या पक्षाच्या पाठीशी उभी करतात? यावरदेखील बरीच गणिते अवलंबून असणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याचीदेखील शक्यता आहे.

मागील निवडणुकीत अशी होती स्थिती
मागील 2017 च्या निवडणुकीत पाल-केर्‍हाळा गटातून नंदा पाटील (भाजप) खिरवड-ऐनपूर गटातून रंजना पाटील (भाजपा), निंभोरा-तांदलवाडी गटात नंदकिशोर महाजन (भाजपा), थोरगव्हाण-मस्कावद गटात कैलास सरोदे (भाजपा), )थोड्याश्या मताने विवरा-वाघोदा गटात आत्माराम कोळी (राष्ट्रवादी) तर खिरोदा-चिनावल गटात सुरेखा पाटील (काँग्रेस) विजयी झाल्या होत्या.