निवडणूक निकालापर्यत रंगणार चर्चा, तर्क-वितर्कांना येणार ऊत

0

जळगाव । जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 67 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 134 गणासाठी गुरुवारी 16 फेबु्रवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्याभरात किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. मतदानानंतर जिल्ह्यातील 776 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदानानंतर निकाल आठवड्याभरानंतर लागणार असल्याने गावा-गावात गप्पा रंगणार असुन विविध तर्क- वर्तक लावले जात आहे. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदानाची गणिते मांडत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडूण येणार असल्याचे दावा करीत आहे. मात्र खरे चित्र निकालानंतरच स्पष्ट होईल. आता सर्वांनाचा निकालाची उत्सुकता लागली आहे. संपुर्ण जिल्ह्यात 62.79 टक्के मतदान झाले आहे. राजकीय पक्षाच्या दिग्गजांनी निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांकडून निवडणूकीचा आढावा घेत आहे.

कार्यकर्ते नोकरदार मंडळी घालविणार थकवा

गेल्या महिन्याभरापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसंबंधी आचारसंहिता निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आली होती. निवडणूक जाहिर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये धावपळ सुरु झाली. अर्ज माघारीनंतर प्रचाराला आठवड्याभराचा कालावधी मिळाल्याने पक्ष कार्यकर्त्यानी आठवड्याभरातच मतदारसंघ अगदी पिंजुन काढले. पक्षाचे कार्यकर्ते आणि शासनाचे कर्मचारी यांना निवडणुक प्रक्रिये दरम्यान आलेला थकवा विश्रांती नंतर घालविणार आहे.

‘हार-जित’ कडे लक्ष

जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा संबोधले जात असल्याने या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागुन आहे. सर्वच राजकीय पक्षाने या निवडणुकीसाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. मुख्यमंत्र्यांपासून तर आमदार, खासदारांपर्यत सगळ्यांनीच पक्षासाठी सभा घेत प्रचार केला आहे. आता मतदानांतर कोण हरणार? कोण जिंकणार? याच्याकडे जनतेचे लक्ष लागुन आहे.

आठवडाभर रंगणार चर्चा

मतदानानंतर निकाल गुरुवारी 23 फेंबु्रवारी रोजी म्हणजे आठवड्याभरानंतर लागणार आहे. आठवड्याभराचा कालावधी असल्याने नेते, कार्यकर्ते गावा-गावातील मतदानाचा आढावा घेत असुन किती मत मिळणार याचा अंदाज बांधत आहे. या ठिकाणी इतके तर त्या ठिकाणी तितके मतदान मिळणार अशी चर्चा राजकीय नेते, कार्यकर्ते व जनतेमध्ये सुरु आहे.