निवडणूक आयोगाला पाठवली ठाकरेंनी ही तीन पसंतीची चिन्हे

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असताना उद्धव ठाकरे यांनी पसंतीची तीन चिन्हे निवडणूक आयोगाला पाठवल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोग आता नेमके कोणते चिन्हे ठाकरेंना देणार याकडे लक्ष लागले आहे.

ठाकरेंच्या नवीन पक्षाचे चिन्हदेखील ठरले
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात आता सोमवारपर्यंत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना पसंतीच्या 3 चिन्हाचे पर्याय देण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नवे चिन्ह ठरल्याची माहिती समोर आली आहे.

या तीन चिन्हांना दिली पसंती
उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हाची पसंती दिली आहे. त्यानुसार या तीन चिन्हापैकी कुठलं चिन्ह निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंच्या पक्षाला देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

दोन्ही गटांना दिले होते आदेश
धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायापैकी त्यांना हवे ते वेगवेगळे चिन्ह मिळेल. त्यासाठी तीन पर्याय देण्याचे दोन्ही गटांना आदेश दिले होते त्यानुसार उद्धव ठाकरेंनी तीन पसंतीची चिन्हे दिले आहेत.

प्रत्येक चिन्हामागे दडलाय हा ‘अर्थ’
हिंदू धर्माशी निगडीत उद्धव ठाकरेंनी हे 3 चिन्ह सुचवले आहेत. त्यात त्रिशूल हे भगवान शंकराचं शस्त्र आहे. उगवता सूर्य हा भगव्या प्रकाशात नवी पहाट आणण्याचं प्रतीक आहे. तर मशाल ही क्रांतीचं प्रतिक मानले जाते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून या तीन पैकी एक चिन्ह देण्यात यावं अशी विनंती केल्याचं समोर आले आहे.