निवडणुकीसाठी यादव पिता-पुत्र एकत्र येण्याची शक्यता!

0

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा तिढा सुटलेला नाही. ’सायकल’ चिन्हावर दावा करणारा मुलायमसिंह गट आणि विरोधी अखिलेश यादव गटाची बाजू शनिवारी निवडणूक आयोगाने ऐकून घेतली, पण आयोगाने याबाबतचा निकाल राखून ठेवला. दोन्ही गटांच्या या संघर्षात पक्षाचे चिन्ह गोठवले जाऊ शकते. त्यामुळे यादव पिता-पुत्र एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयोगासमोर झाली सुनावणी
निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान मुलायमसिंह व शिवपाल यादव, तर अखिलेश गटातर्फे रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल, किरणमयी नंदा आणि इतर नेते उपस्थित होते. अखिलेश गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी, तर मुलायमसिंह गटातर्फे वरिष्ठ वकील मोहन प्रशारण यांनी बाजू मांडली. समाजवादी पक्षात फूट नसल्याचे एकीकडे नेते म्हणतात आणि दुसरीकडे निवडणूक चिन्ह आपल्याच गटाला मिळावे, अशी मागणी करतात. याचाच अर्थ समाजवादी पक्षात फूट असल्याचे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले. तसेच, निकाल राखून ठेवला. यापुढे सुनावणी होणार नसून, आयोगाकडून केव्हाही निकाल जाहीर केला जाऊ शकतो, असेही येथे सांगण्यात आले.

यादव पिता-पुत्रास चिंता
यादव पिता-पुत्रांची चिंता यामुळे वाढली असून, निवडणुकीपुरती का होईना; हातमिळवणी कशी करता येईल यासाठीच्या प्रयत्नांना सुरवात झाली आहे. आता पिता-पुत्रांच्या एकत्र येण्याची चर्चा पक्षांतर्गत सुरु झाली आहे. दोघे एकत्र आल्यास पक्षाला निश्‍चितच फायदा होवू शकतो. दुसरीकडे शिवपाल यादव आणि अमरसिंह यांचा मुलायमसिंह यांच्यावर तडजोड न करण्यासाठी दबाव आहे, तर अखिलेश यांच्या गटातले रामगोपाल यादवही दुसर्‍या गटाशी तडजोडीच्या विरोधात आहेत. मात्र, मुलायमसिंह आणि अखिलेश यांनी एकमेकांना नरमाईच्या भूमिकेचे
संकेत दिले आहेत.