निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पुर्ण

0

जळगाव । मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी गुरुवारी 16 फेबु्रवारी मतदान होत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असुन प्रचार शिंगेला पोहचला आहे. मंगळवारी रात्री बारा वाजेपासुन निवडणुक प्रचार बंद होणार असुन गुप्त प्रचाराला बुधवार हा एकच दिवस शिल्लक असणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाची कसोटी पणाला लागली आहे. जिल्ह्यातील 67 जिल्हा परिषद गटासाठी तर 134 पंचायत समिती गणासाठी 16 फेबु्रवारी रोजी मतदान होणार असुन प्रशासन देखील निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. प्रशासनाची निवडणुकीसंबंधी सर्व तयारी पुर्ण झाली आहे. निवडणुक प्रक्रिया पार पाडणारे कर्मचारी आज बुधवारी 15 रोजी मतदान केंद्रावर पोहचणार आहे.

इव्हिएम मशिन झाले शिलबंद
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इव्हिएम मशिन(इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन) शिलबंद करण्यात आले आहे. मशिन बुधवारी 15 रोजी संबंधीत मतदान केंद्रावर कडक बंदोबस्तात पोहचविण्यात येतील. गुरुवारी सकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींना मशिन दाखवून काही हरकत नसल्याची खात्री करुन मशिन सुरु करण्यात येईल. प्रचार बंदीनंतर कोठेही राजकीय पक्षाचा प्रचार होतांना आढळल्यास संंबंधीत उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मिडीयावर देखील नजर असणार आहे.

मद्यविक्री व आठवडे बाजार बंद
निवडणुकीच्या प्रचार मध्यरात्रीपासुन बंद होणार असुन निवडणुकीदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडु नये यासाठी प्रशासनाने पुर्ण तयारी केली आहे. मतदानाच्या अगोदर एक दिवस, मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्याभरात मद्यविक्री बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे. तसेच मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी ज्या गावाचा आठवडे बाजार असेल तो देखील बंद ठेवण्यात येणार आहे.

मतदान केंद्रे
तालुका निहाय मतदान केंद्रे- चोपडा- 234, यावल-160, रावेर-203, मुक्ताईनगर-134, बोदवड-59, भुसावळ-114, जळगाव-178, जामनेर-273, पाचोरा-185, भडगाव-117, चाळीसगाव-256, अमळनेर-191, पारोळा-131, एरंडोल-99, धरणगाव-123 अशी एकुण दोन हजार 457 मतदान केंद्रे 15 तालुक्यात आहेत. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यत या मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.