निवडणुकीत भाजपाचा वारु चौफेर उधळला

0

भुसावळ । तालुक्यात जिल्हा परिषदेत भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी एक तर भाजपाने सर्वाधिक चार जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. त्यामुळे या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले असून भाजपाने जोरदार एंट्री केली असल्याचे दिसून आले. तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरुवार 23 रोजी यावल रोडवरील शासकीय धान्य गोडाऊनमध्ये मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, सहायक अधिकारी तथा तहसीलदार मीनाक्षी राठोड, गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांच्या उपस्थितीत पार पडली. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होऊन अवघ्या चार तासात म्हणजेच दुपारी 1 वाजेपर्यत सर्व निकाल हाती आला. जिल्हा परिषदेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली तर पंचायत समितीमध्ये भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले असून सहापैकी चार जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा खेचून आणली.

मुक्ताईनगरात भाजपाचे वर्चस्व कायम
मुक्ताईनगर तालुक्यात चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत चारही गट भाजपाने राखले तर मुक्ताईनगर गण शिवसेनेकडे व अंतुर्ली गण राष्ट्रवादीकडे सोडता बाकीच्या सहा गणांवर भाजपाने आपला झेंडा रोवला आहे. येथील तहसिल कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती मतमोजणी प्रक्रिया कडक बंदोबस्तात करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गणेश मिसाळ व सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून तहसिलदार जितेंद्र कुंवर यांनी काम पाहिले. यावेळी मतमोजणीसाठी 1 ते 8 टेबल जिल्हा परिषद गटासाठी व 9 ते 16 टेबल पंचायत समितीसाठी असे 16 टेबल लावण्यात आले. यासाठी एक एसआरपी सेक्शन, एक आरसीपी प्लाटून, 35 पोलीस शिपाई, चार पोलीस अधिकारी, 14 पुरुष होमगार्ड व चार महिला होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल होते. ही प्रक्रिया सकाळी 9 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत पार पाडल्यात आली.

भुसावळला चार तासात निकाल जाहीर
मतमोजणी कक्षात 16 टेबलवर 110 कर्मचार्‍यांनी टपालीसह 230 ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठीची मतमोजणी एकाच वेळी झाली.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार मिनाक्षी राठोड, उमेदवार व प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात आला. ईव्हीएमबाबत खात्री केल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. तसेच यावेळी पोस्टल मतदानाची मतगणना स्वतंत्र 2 टेबलांवर करण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारीला मतदान झाले होते. यानंतर 37 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये एका वेळी एक गट एक गणाचा निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्या गटाचा निकाल सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास जाहीर झाला.

रावेरला भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
रावेर तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीत आठ जागा जिंकून भाजपाने आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, भारतीय कॉग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. तसेच जिल्हा परिषदेत भाजपाला चार तर कॉग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आला आहे. येथील तहसील कार्यालयात निकाल जाहिर होताच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यामध्ये शिक्षण सभापती सुरेश धनके, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन, सरचिटणीस वासुदेव नरवाड़े, सरपंच अरुण महाजन, दिलीप धनके, श्रीकांत सरोदे आदी उपस्थित होते. मतमोजणी प्रक्रिये प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी काम पाहिले.

150 पोलिसांचा बंदोबस्त
मतमोजणीवेळी सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला. एकूण 150 पोलिस कर्मचार्‍यांसह तीन पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, आरसीपी प्लॉटून, शहर, बाजारपेठ तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावल रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली असून रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते.

रावेर तालुक्यात या आधी भाजपाला पंचायत समितीमध्ये सहा जागा होत्या, परंतु या निवडणूकीत त्यात दोन जागांची भर पडून आठ झाल्या व आमचे स्पष्ट बहुमत आले तर जिल्हा परिषदेत मागील वेळेस चार होत्या तेवढ्याच जागा आम्ही कायम ठेवल्या आहे. जनतेने विकासाला मत देऊन पुन्हा भाजपावर विश्‍वास दाखविला आहे.
– सुनील पाटील,
भाजपा तालुकाध्यक्ष, रावेर