निलंबित खासदारांकडून सभागृहात पुन्हा गोंधळ

0

नवी दिल्ली : कृषी विषयक बिलांवरून काल रविवारी राज्यसभेत चांगलाच हंगामा झाला. शेतकरी विरोधी बिल असल्याने कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. मात्र आवाजी मताने विधेयक मंजूर झाले. यावेळी कॉंग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ घालत राज्यसभा उपसभापतींशी हुज्जत घातली. हे प्रकरण आता चांगलेच भोवले आहे. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान आज सोमवारी निलंबित खासदार राज्यसभा सभागृहात आले. राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी निलंबित खासदारांना सभागृहातून जाण्याचे आदेश दिले. निलंबित खासदारांचे वक्तव्य रेकोर्डवर घेऊ नका असे आदेश सभापतींनी दिले. मात्र निलंबित खासदारांनी आजही सभागृहात गदारोळ केला.

डेरेक ओ’ ब्रिएन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन या आठ खासदारांच्या नावाची घोषणा सभापतींनी केली, त्यांना बाहेर जाण्याचे आदेश दिले, मात्र त्यांनी काही वेळ गदारोळ केला. निलंबित खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.