निर्माते सुभाष घई यांच्या शाळेला साडे पाच एकर जागा देण्यास सरकारची मान्यता

0

मुंबई- चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल स्कूल’ला साडे पाच एकर जागा देण्यास भाजपा सरकारने मंजुरी दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असून विशेष म्हणजे विरोधी पक्षात असताना याच मुद्द्यांवरुन भाजपाने रान उठवले होते.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात निर्माते घई यांच्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल स्कूल’साठी साडेपाच एकर जागा देण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरूपयोग करून नियमबाह्यपणे ही जागा दिल्याचा आरोप करत या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ही जमीन ‘व्हिसलिंग वूड्स’ किंवा चित्रपट विकास महामंडाळाला जमीन देण्यात आलेली नसून ‘मुक्ता आर्ट्स’ ला जमीन देण्याबाबतच्या या निर्णयात कायदेशीर प्रक्रियेचे पालन झालेले नसल्याचे सरकारने न्यायालयात मान्य केले होते.

कॅगनेही या जमीनीच्या व्यवहारात घोटाळा झाला असून सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर सरकारचा हा निर्णय रद्द करीत जमीन परत करण्याचे आदेश न्यायालयाने घई यांना दिले होते.

‘व्हिसलिंग वूड्स’ला देण्यात आलेली ही जागा ताब्यात घेण्याऐवजी ती तब्बल ३० वर्षांसाठी तिही नाममात्र अशा रेडी रेकनरच्या दरात घई यांना देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने घेतला होता. मंगळवारी हा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळासोर ठेवण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत ही जमीन ताब्यात घेण्याबाबत ठोस कारवाई करण्याऐवजी ती घई यांच्याच ताब्यात कशी राहील याचीच खबरदारी सरकारने घेतल्याचे यावरुन स्पष्ट झाल्याची टीका होत आहे.