निर्मल ग्राम योजनेचा फज्जा

0

मुक्ताईनगर : निर्मल शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे या योजना फोल ठरत असल्याचे दिसून येते त्याचाच प्रत्यय येथे दिसून आला असून निर्मल ग्राम योजनेंतर्गत हगणदारीमुक्तीचे उद्दिष्ट गाठण्याच्या सुचना ग्रामपंचायतीस देण्यात आल्या होत्या. त्यादृष्टीने जिल्हा परिषद वारंवार आढावा घेत आहे. या कामात कुचराई करणार्‍यांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सुस्त अधिकारी केवळ हातावर हात धरुन बसल्याने या योजनेचा फज्जा उडाला आहे. पंचायत समिती व उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्ता तसेच वनखात्याच्या कार्यालयाच्या बाजुस सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. ग्रामपंचायतीने हगणदारीमुक्तीचा फलक शौचालयावर लावलेला असल्यावर सुध्दा रस्त्याच्या कडेस शौचास बसतात. विशेष म्हणजे तेथे पोलीस स्टेशनच्या मागील बाजुस देखील शौचास बसले जाते. परंतु अशांवर कारवाई देखील होत नाही. ग्रामपंचायतीने बांधलेल्या शौचालयाची साफसफाई होत नाही. तेथे मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली आहे. तसेच सेफ्टी टँकचा पाईप फुटला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव उघड्यावर शौचास जावे लागते.

सार्वजनिक शौचालयांची झाली दुरवस्था
काही महिलांनी यासंदर्भात आपल्या भागातील ग्रामपंचायत सदस्यांकडे तक्रार करुनसुध्दा लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नाईलाजास्तव महिलांना उघड्यावर बसावे लागते. यासह पंचायत समिती कार्यालयासमोर वनखाते असल्याने त्याच्या आजुबाजुस रात्रीच्या वेळेस शौचास बसले जाते. त्यामुळे वनखात्याच्या कर्मचार्‍यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या प्रकराला आळा घालण्यासाठी पंचायत समितीसह ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

डिसेंबर अखेरची दिली मुदत
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी 16 डिसेंबर रोजी तालुक्यातील शौचालय बांधकाम योजनेच्या कामाचा आढावा घेतला होता. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील 10 ग्रामसेवकांना नोटीस देण्याचे आदेश गटविकास अधिकार्‍यांना दिले होते. 17 रोजी गटविकास अधिकार्‍यांनी या ग्रामसेवकांना नोटीस देवून डिसेंबर अखेर पर्यंत किमान 50 शौचालयांची बांधकामे पूर्ण न केल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसीत म्हटले आहे. त्यामुळे मुदतीच्या आत काम न झाल्यास किती ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई होते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.

नोटीस दिलेले ग्रामसेवक
मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केलेल्या सुचनेनुसार ए.एस. पाडवी चिंचखेडा बु., एस.बी. अहिरे सुळे भोटा, एस.आर. भालेराव धामणदे, जे.आर. कोचुरे सारोळा, आर.एस. मुंडके चांगदेव, एस.वाय. उचित मुंडोळदे, एफ.एम. मथुरे तरोळा, आर.के. नागरुत निमखेडी बु., डी.जी. पटवारी कोर्‍हाळा, एम.एस. घोडके राजुरा यांचा समावेश आहे तर टाकळी येथील ग्रामसेवक एस.एम. पाटील, थेरोळा येथील जी.आर. चव्हाण, नांदवेल येथील मनिष मेढे या तीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे.